पिंपरी-चिंचवड येथील पोलीस मुख्यालयाला जागा न देण्याची देहू विश्वस्तांची मागणी !

देहू देवस्थानाच्या मागण्यांकडे प्रशासनाने प्राधान्याने लक्ष द्यावे, ही अपेक्षा !

देहू – येथील दीडशे एकर गायरानपैकी ५० एकर गायरान हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाला देण्याच्या हालचाली सरकारने चालू केल्या आहेत. याला रहिवासी आणि देहू संस्थानचे विश्वस्त यांचा विरोध असून हे गायरान देहूकरांच्या हक्काचे आहे. या गायरानला वारकरी भवनासह इतर वास्तू उभारण्यासाठी आणि दिंडी विसाव्यासाठी आरक्षित करावे, अशी मागणी देहू संस्थानच्या विश्वस्तांनी केली आहे. जोपर्यंत सरकार आमच्या उपोषणाची नोंद घेत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण करण्यावर ठाम रहाणार आहोत, अशी भूमिका देहू संस्थानच्या विश्वस्तांनी मांडली आहे. त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच बेमुदत उपोषण चालू केले आहे. लवकरात लवकर प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावावा. गायरानची जागा देहूकरांना द्यावी, अशी मागणी देहू संस्थानने केली आहे.