गुरपतवंत सिंह पन्नू याची दर्पोक्ती !
न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेने ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कथित कट रचल्याच्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ता याला अटक केली आहे. यावर पन्नू याने म्हटले आहे की, ही कारवाई निखिल गुप्ता याच्या विरोधात नाही, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केली जात आहे. ‘मोदी यांनी मला ‘आतंकवादी’ म्हटले, तर सर्व जग माझ्यावर गोळ्या झाडेल’, असे भारताला वाटत होते. मला मारूनही खलिस्तानच्या मागणीवर परिणाम होणार नाही.
‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, आतंकवादी पन्नू याने म्हटले की, तो निखिल गुप्ता किंवा भारतीय अधिकारी यांना ओळखत नाही. मी मृत्यूला घाबरत नाही. आम्ही अमेरिकेत रहातो, ती शूरांची आणि स्वतंत्र लोकांची भूमी आहे.
दोषी असणार्यांचे दायित्व निश्चित व्हावे ! – अमेरिका
अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी निखिल गुप्ता प्रकरणानंतर अमेरिका-भारत संबंधावर प्रतिक्रिया दिली. जॉन किर्बी म्हणाले की, भारत अमेरिकेचा धोरणात्मक भागीदार आहे. आम्ही यापुढेही भारतासमवेतची धोरणात्मक भागीदारी सुधारण्यासाठी आणि ती अधिक सशक्त करण्यासाठी काम करत राहू. याच वेळी हत्येचे कटाचे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतले आहे. भारतानेही हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास चालू केला आहे, हे पाहून आम्ही समाधानी आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे की, या गुन्ह्यात जे दोषी आहेत, त्यांचे दायित्व निश्चित व्हायला हवे.