राष्ट्रसेवा ही योगी बनून केली पाहिजे, भोगी होऊन नव्हे ! – प.पू. प्रेमानंद महाराज

  • रसातळाला चाललेल्या भारतीय समाजाला अध्यात्माची कास धरण्यास शिकवण्याचेही केले विधान !

  • रा.स्व. संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी घेतले दर्शन !

उजवीकडे प.पू. प्रेमानंदजी महाराज मार्गदर्शन करताना 

वृंदावन (उत्तरप्रदेश) – आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्र हे आपल्यासाठी देव आहे. तुम्ही तपाच्या माध्यमातून भजनाद्वारे (नामजपाद्वारे) लाखो लोकांची बुद्धी शुद्ध करू शकता. एक भजन लाखो लोकांचा उद्धार करू शकते. तुम्ही भजन करा, इंद्रियांवर विजय प्राप्त करा आणि राष्ट्रसेवा करा. राष्ट्राच्या सेवेसाठी प्राण समर्पित करा. राष्ट्राची सेवा जितेंद्रीय बनून म्हणजेच योगी बनून करण्याला महत्त्व आहे, भोगी म्हणून नव्हे, असे अनमोल मार्गदर्शन प.पू. प्रेमानंदजी महाराज यांनी येथे केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि संघाचे अन्य पदाधिकारी प.पू. महाराजांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या आश्रमात नुकतेच आले होते. त्या वेळी प.पू. महाराजांनी अध्यात्म आणि साधना यांचे महत्त्व सांगितले. प.पू. महाराजांच्या मार्गदर्शनाच्या हा व्हिडिओ एकाच दिवसात लक्षावधी लोकांनी पाहिला.

सौजन्य अमर उजाला 

श्रद्धा दृढ असेल, तर सर्वकाही परम मंगलमयच होणार !

या वेळी प.पू. सरसंघचालक म्हणाले की, आपण जे प्रवचनांतून सांगता, तेच आम्ही समाजासमोर मांडतो. आम्ही निराश कधी होणार नाही; परंतु चिंता याची वाटते की, पुढे कसे होणार ? आम्हा सर्वांच्या मनात (हिंदु समाजाचे कसे होणार ?) ही भीती आहे.

यावर प.पू. प्रेमानंद महाराज म्हणाले की, याचे उत्तर अगदी सरळ आहे. आपण भगवान श्रीकृष्णावर श्रद्धा ठेवत नाही. आपल्याला मुख्य गोष्ट जी ध्यानात घ्यायची आहे, ती ही की, काहीही झाले, तरी भगवान श्रीकृष्णावरील श्रद्धा ढळू द्यायची नाही. जर आपली श्रद्धा दृढ असेल, तर सर्वकाही परम मंगलमयच होणार. आपल्याला आपले अध्यात्माचे बळ जाणले पाहिजे. आपण आपल्या स्वरूपाला ओळखतो, त्यामुळे भय कसले ? भगवंत तीन प्रकारच्या लीला करत आहे, त्या म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. ज्यावेळी जसा आदेश असेल, तसे आपल्याला करायचे आहे; कारण आपण त्याचे दास आहोत. तेच होईल, जे मंगल रचले असेल. ते श्रीकृष्णानेच रचले असेल. कधीही संशय करू नका. ज्याप्रकारे श्रीकृष्णाने तुम्हा लोकांना तयार केले, तसाच आणखी एक तो तयार करील. तो सर्वकाही दिमाखात सांभाळेल. तुम्हाला कोणतीच चिंता करायची नाही. आपल्यासमवेत श्रीकृष्ण आहे. निराशा आणि उदासीनतर यांचा आपल्या जीवनावर अधिकारच नाही. कोणत्याही प्रकारे भय नाही कि दु:ख नाही. आपण अविनाशी आहोत. जी सेवा मिळाली आहे, ती करतच जायची. जोपर्यंत श्‍वास आहे, तोपर्यंत सर्व करायचे. शरीर त्यागल्यावर तर त्याच्यातच (भगवंतातच) मग्न व्हायचे आहे.

‘देशवासियांचे विचार शुद्ध करणे’, हा आपला प्रमुख उद्देश असला पाहिजे ! – प.पू. प्रेमानंदजी महाराज

प.पू. महाराज पुढे म्हणाले की, आपल्याला प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण प्रिय आहेत, तसेच आपला देश प्रिय आहे; परंतु आपल्या धर्माचे स्वरूप आपण विसरलो आहोत. आपल्या जीवनाचे लक्ष्य आपल्याला ठाऊक आहे का ? आपल्याला देशातील प्रत्येक व्यक्ती प्रिय आहे; परंतु आज ज्या भावना निर्माण होत आहेत, त्या आपला देश आणि धर्म यांच्यासाठी योग्य नाहीत. हिंसेचे वाढते स्वरूप संकटकालीन आहे. त्यामुळे आपण जनतेला सुख-सुविधा जरी दिल्या, तरी आपल्याला जनतेला सुखी नाही करता येणार. याचे कारण सुखाचे स्वरूप विचारांपासून होते. आपले विचारच अयोग्य असतील, तर काय उपयोग ? आपला उद्देश हा ‘देशवासियांचे विचार शुद्ध करणे’, हा असला पाहिजे.

१. आपल्याला आपल्या आचरणातून, आपल्या संकल्पातून आणि आपल्या वाणीतून समाज अन् राष्ट्र सेवा करायची आहे. मी नेहमीच इच्छा करीन की, तुमच्यासारखे सन्मार्गात प्रेरित करणार्‍यांचे स्वास्थ्य चांगले राहो, ईश्‍वर तुमचे सदैव रक्षण करो आणि तुम्ही पुढे जात राहो.

२. तुम्हाला भगवंताने जो जन्म दिला आहे, तो केवळ व्यवहारिक आणि आध्यात्मिक सेवा करण्यासाठीच दिला आहे. आपल्याला आपल्या देशवासियांना सुखी करायचे असेल, तर ते केवळ सुविधा आणि वस्तू यांच्या माध्यमातून आपण नाही करू शकत. त्यासाठी त्यांच्या बौद्धिक स्तरामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. आपल्या समाजाचा बौद्धिक स्तर खालावत चालला आहे. ही चिंतेची गोष्ट आहे. आपण सुविधा देऊन त्यांना भोगविलासाची माध्यमे उपलब्ध करून देऊ, परंतु त्यांच्या हृदयाच्या मलीनतेचे काय ? त्यांच्यातील हिंसात्मक प्रवृत्ती, अपवित्र बुद्धी याने काहीच उपयोग होणार नाही.

३. आपला देश धर्मप्रधान आहे. आपल्या शिक्षणपद्धतीने केवळ आधुनिक रूपच घेतले आहे; नव्या पिढीतील हिंसात्मक प्रवृत्ती पाहून पुष्कळ दु:ख होते. त्यामुळे मी नेहमीच हे पहातो की, जेवढे लोक माझ्यासमोर येतील, त्यांची बुद्धी शुद्ध व्हायला हवी.

वृंदावन येथील प.पू. प्रेमानंद महाराज यांचा परिचय !

प.पू. प्रेमानंद महाराज हे उत्तरप्रदेशच्या वृंदावन येथील थोर संत असून ते भक्तीयोगाच्या माध्यमातून हिंदूंना ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग दाखवतात. ते भक्तांना श्रीकृष्णाच्या राधेची उपासना करण्यास सांगतात. गेल्या १७ वर्षांहून अधिक काळापासून त्यांचे दोन्ही मूत्रपिंड निकामी आहेत. त्यांना एक दिवसाआड ‘डायलिसिस’ करावे लागते; परंतु ईश्‍वराच्या अनुसंधानात असल्यामुळे त्यांना त्या पिडेचे काहीच वाटत नाही. ‘मला डॉक्टरांनी सांगितले होते की, मी केवळ ६ महिने जगीन; परंतु गुरुकृपेने मी आज १७ वर्षांनंतरही जीवित आहे. साधनेचे हेच अलौकिक महत्त्व आहे’, अशा प्रकारे स्वत:चे उदाहरण देऊन ते समाजाला वारंवार ‘साधना करा’, असा उपदेश करतात.