Indian Navy Day 2023 : मालवण (सिंधुदुर्ग) येथे होणार्‍या नौसेना दिनाच्या सिद्धतेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून या वर्षीचा नौसेना दिवस सिंधुदुर्ग किल्ल्यावर !

मुंबई : यंदाचा नौसेना दिन (४ डिसेंबर) सिंधुदुर्ग किल्ल्यावर भव्य-दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. या निमित्ताने राजकोट, मालवण येथे उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.

नौसेनेच्या अधिकार्‍यांशी चर्चा करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि नौदल अधिकारी

या दोन्ही कार्यक्रमांच्या सिद्धतेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २२ नोव्हेंबर या दिवशी आढावा घेतला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रस्ते, विविध पायाभूत सुविधा आदींचा आढावाही या वेळी घेण्यात आला. सर्व यंत्रणांनी या कार्यक्रमांचे समन्वयाने नियोजन करण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘सह्याद्री’ या अतिथीगृहात झालेल्या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह नौदलाचे अधिकारी आदी उपस्थित होते.