Freebies Distribution In Assembly Elections : १ सहस्र ७६० कोटी रुपयांची दारू, अमली पदार्थ आणि रोख रक्कम जप्त !

  • ५ राज्यांतील विधानसभांच्या निवडणुका

  • मतदारांना आकर्षित करण्यासाठी वस्तू आणि पैसेही वाटण्यात येत असल्याचे उघड !

नवी देहली – राजस्थान, मिझोराम, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या ५ राज्यांतील विधानसभांच्या निवडणुका होत आहेत. या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने माहिती देतांना सांगितले की, निवडणुकीच्या कालावधीत या ५ राज्यांतून आतापर्यंत १ सहस्र ७६० कोटी रुपयांची दारू, अमली पदार्थ, रोख रक्कम आणि महागडे धातू जप्त करण्यात आले आहेत. हा आकडा या राज्यांमधील वर्ष २०१८ मधील विधानसभांच्या निवडणुकींत झालेल्या जप्तीच्या रकमेच्या ७ पट आहे. गेल्या वेळी २३९ कोटी १५ लाख रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. आता जप्त करण्यात आलेल्या वस्तू आणि पैसे मतदारांना आकर्षित करण्यासाठी वाटण्यात येत होते. निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यापासून, म्हणजे ९ ऑक्टोबरपासून या वस्तूंची जप्ती चालू होती.

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, याआधी निवडणुका झालेल्या ६ राज्यांमधून (हिमाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा, गुजरात आणि कर्नाटक) १ सहस्र ४०० कोटी रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. या राज्यांमध्ये गेल्या निवडणुकींत झालेल्या जप्तीच्या रकमेच्या ११ पट आहे.

संपादकीय भूमिका

मतदारांना दारू, पैसे आदी वाटले जाते, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. यात नवीन काहीच नाही. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणार्‍या भारतात असे वर्षानुवर्षे घडत आहे, हे भारतियांना लज्जास्पद !