…सामाजिक उदारतेचा पुनर्विचार करण्‍याची वेळ आली आहे !

तमिळनाडू सरकारमध्‍ये मंत्री असलेले आणि त्‍या राज्‍याच्‍या मुख्‍यमंत्र्यांचे चिरंजीव उदयनिधी स्‍टॅलीन यांनी काही दिवसांपूर्वी ‘सनातन हिंदु धर्म, म्‍हणजे कोरोना, मलेरिया यांसारखा रोग आहे आणि तो आपल्‍याला संपवलाच पाहिजे’, अशा अर्थाचे एक विधान केले होते. प्रसिद्धी माध्‍यमांमधून त्‍यावर गदारोळ चालू आहे. अनेक पातळ्‍यांवर त्‍याची नोंद घेतली गेली. एखाद्या ख्रिस्‍ती किंवा मुसलमान माणसाकडून हिंदु धर्माच्‍या विरोधात केले गेलेले, हे पहिलेच विधान नाही. या आधीही अनेकदा आणि अनेक लोकांनी अशी विधाने केलेली आहेत. अशा प्रकारच्‍या एखाद्या विधानाकडे कितपत लक्ष द्यावे, हा जरी प्रश्‍न असला आणि त्‍याकडे दुर्लक्ष करता येणे सहज शक्‍य असले, तरी त्‍या मागची भावना मात्र नक्‍कीच दुर्लक्ष करण्‍याजोगी नाही. एकेश्‍वरवादी धर्म, म्‍हणजे ख्रिस्‍ती किंवा इस्‍लाम या धर्मांचा हा दृष्‍टीकोन पुष्‍कळ आधीपासून, म्‍हणजे हे दोन्‍ही धर्म स्‍वतःच्‍या धर्मांचा प्रसार करत या भारतवर्षामध्‍ये येण्‍यात यशस्‍वी झाले, तेव्‍हापासूनचा आहे. येथे ‘भारतवर्ष’ हा शब्‍द वापरण्‍याचे कारण आजच्‍या भारतीय प्रादेशिक सीमांच्‍या पलीकडे (अगदी अखंड भारताच्‍या आजच्‍या सीमांच्‍याही पलीकडे) कधी काळी सनातन हिंदु धर्माचे अस्‍तित्‍व होते, हे लक्षात आणून देणे, हेच आहे.

१. उदारतेचा परिणाम धर्मसमुदायाच्‍या मानसिकतेवर !

एका बाजूला इस्‍लाम आणि ख्रिस्‍ती धर्माचा अहंकार अन् असहिष्‍णुता, तर दुसरीकडे सनातन हिंदु धर्माची उदारता, सन्‍मान आणि सहिष्‍णुता यांची शिकवण आहे. एकेश्‍वरवादी धर्म एकच पुस्‍तक आणि एकच मार्ग किंवा पद्धत इतरांवर थोपवू इच्‍छितात, तर सनातन हिंदु धर्म मात्र अनेक पद्धती, मार्ग अन् अनेकांगी तत्त्वज्ञान यांचा अंगीकार करणारा आहे. या उदारतेचा परिणाम अर्थातच या धर्मसमुदायाच्‍या मानसिकतेवर झालेला आहे, म्‍हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना आधुनिक काळात ‘सेक्‍युलर’ (निधर्मी) ठरवण्‍याचा ‘लिब्रांडूं’कडून (कथित उदारमतवादी) प्रयत्न होतांना दिसतो अन् बहुसंख्‍य लोक त्‍यावर मूग गिळून गप्‍प बसतात. त्‍यामुळे आज यावर समस्‍त हिंदु समाजाने वेगळा विचार करण्‍याची आवश्‍यकता आहे. ‘आम्‍ही सहिष्‍णू आहोत’; पण आमच्‍या धर्मासंबंधी वेडेवाकडे शब्‍द सहन केले जाणार नाहीत, हे सांगायची वेळ आलेली आहे.

२. हिंदु समाजाने अधिक जागृत होऊन दुष्‍प्रवृत्तींच्‍या विरोधात पवित्रा घेणे आवश्‍यक !

सहनशीलता आणि सहिष्‍णुता यांत मुळात अंतर आहे. सहिष्‍णुतेत सर्व प्राणिमात्रांचे अस्‍तित्‍व महत्त्वपूर्ण आणि निर्णायक मानले गेले आहे. सहनशीलतेचा उगमच मुळात दुबळेपणातून झालेला असतो. जोपर्यंत इतर धर्मीय आपल्‍या धर्मश्रद्धांचे पालन करत असतात, तोपर्यंत सहिष्‍णू वृत्ती योग्‍य असते; पण जेव्‍हा हेच इतर धर्मीय आपल्‍या धर्मश्रद्धांवर आक्रमण करतात, आपल्‍या धर्माला उखडून टाकण्‍याची इच्‍छा करतात, तशी भाषा करतात आणि तरीही जर एखादा समाज शांत रहातो, तर ती सहनशीलता म्‍हणावी लागेल. इथे हिंदु समाजाला त्‍यांचा पारंपरिक पवित्रा सोडून देण्‍याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. पारंपरिक पवित्रा, म्‍हणजे अशा वक्‍तव्‍यांकडे दुर्लक्ष करणे. कोणतीही प्रतिक्रिया न देता आपल्‍या धर्मश्रद्धांचे पालन करणे, दोन समाजांमधील सौहार्द कायम ठेवणे इत्‍यादी.

पालटत्‍या काळानुसार आज हिंदु समाजाने अधिक जागृत होऊन या प्रवृत्तींच्‍या विरोधात पवित्रा घेतला पाहिजे. आजच्‍या काळात हिंदु समाजाने अशा घटनांच्‍या विरोधात उच्‍चारवाने व्‍यक्‍त होणे आवश्‍यक आहे. समाजाच्‍या सर्व स्‍तरांवरून अशा वल्‍गना करणार्‍यांचा निषेध नोंदवला जाणे, हा याचा एक भाग झाला. आज अशा लोकांना उघड आव्‍हान दिले जाणे आवश्‍यक आहे. आता हिंदूंनी इतर धर्मांतील दोष-उणिवांवर तार्किक आक्रमण केलेच पाहिजे. अंधश्रद्धा, दोष, अतार्किक प्रथा, परंपरा, अपप्रवृत्ती इत्‍यादी इस्‍लाम आणि ख्रिस्‍ती धर्मांत मोठ्या प्रमाणावर आहेत. इतर धर्मीय जर हिंदु धर्म आणि आमच्‍या देवता यांची निंदा करतील, तर हिंदूही इतर धर्मांमधील दोष अन् उणिवा तेवढ्याच आक्रमकपणे समोर आणतील, हे दाखवून देण्‍याची वेळ आलेली आहे.

३. पक्षीय मतभेद, स्‍वार्थ आणि जात यांच्‍या पलीकडे हिंदु समाजाने कृती करायला हवी !

याकरता केवळ आपला हिंदु धर्म, संस्‍कृती आणि सांस्‍कृतिक इतिहास यांचा अभ्‍यास पुरेसा नसतो, तर इतर धर्मांचाही अभ्‍यास आवश्‍यक असतो. दुसरे महत्त्वपूर्ण सूत्र, म्‍हणजे आमच्‍या धर्मश्रद्धांना समाजातील प्रत्‍येक माणसाने आपल्‍यापरीने उजळणी करण्‍याचा प्रयत्न करणे. अयोध्‍येतील श्रीराममंदिर उभारणीसाठी निधी संकलनात पक्षीय मतभेदांमुळे अनेक हिंदू सहभागी होणे टाळतांना दिसले. राममंदिर उभारणी ही सर्व हिंदु समाजाच्‍या अग्रक्रमाचा विषय होता आणि आहे; पण अनेक जण राममंदिर उभारणी हे संघ आणि भाजप यांचाच जणू विषय आहे, असे दाखवत होते. आज पुन्‍हा एकदा राजकीय स्‍वार्थ साधण्‍यासाठी अशी मंडळी राममंदिर उभारणीचे स्‍वागत करतांना दिसतात. पक्षीय मतभेद आणि स्‍वार्थाच्‍या पलीकडे जाऊन हिंदूंनी आज विचार केला पाहिजे. असा विचार हिंदू आजही करू शकत नाहीत, हे दुर्दैवी आहे. राजकीय पक्षांनी आम्‍हाला जातीपातींमध्‍ये विभागून ठेवले आहे. इतर धर्मियांच्‍या एकगठ्ठा मतांसाठी एरव्‍ही धर्माभिमान दाखवणारे नेते अशा वेळी गप्‍प बसलेले दिसतात. पक्षीय मतभेद, स्‍वार्थ आणि जातीय अस्‍मिता या सर्व गोष्‍टींच्‍या पलीकडे जाऊन हिंदु समाजाने आज कृती करण्‍याची आवश्‍यकता आहे.

४. धर्मविरोधकांना सडेतोड प्रत्‍युत्तर देण्‍यासाठी हिंदूंनी करावयाच्‍या कृती

आम्‍ही आमचे उत्‍सव साजरे करतो. घरोघरी विविध धार्मिक विधी करतो; पण तेवढे पुरेसे नाही. आमच्‍या अवतीभवती असलेल्‍या आणि सोयीस्‍कर मौन बाळगणार्‍या सर्वांपर्यंत या विषयावर आपल्‍या सुस्‍पष्‍ट भावना पोचवणे आवश्‍यक आहे. या भावना शब्‍दांनी त्‍यांच्‍याशी संवाद साधून पोचवल्‍याच पाहिजेत. त्‍याच वेळी प्रत्‍येक हिंदूने प्रत्‍येक आठवड्याला एखाद्या मंदिराला सहकुटुंब भेट दिली पाहिजे. ही भेट त्‍या मंदिरातील आरतीच्‍या वेळी देऊन आम्‍ही इतरांना अधिक चपखल उत्तर देऊ शकतो, हे निश्‍चित ! सर्व हिंदु स्‍त्री-पुरुषांनी कपाळावर गंध / टिळा लावणे चालू केले पाहिजे. ‘आम्‍ही हिंदु आहोत’ आणि या सनातन हिंदु धर्मावर आमच्‍या अतूट श्रद्धा दाखवण्‍याचा हा एक सहज मार्ग आहे. हिंदूंनी सगळे सण-उत्‍सव पूर्ण उत्‍साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरे केले पाहिजेत. सार्वजनिक गणेशोत्‍सव वा दुर्गापूजा असो; येथून पुढे प्रत्‍येक हिंदूने स्‍वतःचा सहभाग नोंदवला पाहिजे. गणेशोत्‍सवात इस्‍लामिक आक्रमण, ख्रिस्‍त्‍यांनी हिंदूंवर केलेले अत्‍याचार, श्रीराम आणि श्रीकृष्‍ण यांचे चरित्र, छत्रपती शिवाजी महाराज अन् छत्रपती संभाजी महाराज, पेशव्‍यांचे युद्ध कौशल्‍य, छत्रसालाची कामगिरी, स्‍वातंत्र्यवीर सावरकर याच विषयांवर व्‍याख्‍याने आणि ‘स्‍लाईड शो’ यांचे आयोजन करून प्रचंड मोठ्या प्रमाणात जागृती करण्‍याची आवश्‍यकता आहे.

५. …यासाठी समस्‍त हिंदु समाजाने एकत्र आलेच पाहिजे !

२ वर्षांपूर्वी अमेरिकेत ‘डिसमेंटलिंग ग्‍लोबल हिंदुत्‍व’ (हिंदुत्‍वाचे समूळ उच्‍चाटन) या विषयावर परिसंवादाच्‍या आयोजनापासून पुन्‍हा नव्‍याने चालू झालेला हा हिंदुत्‍व विरोध ‘सनातन हिंदु धर्म कोरोना महामारीसारखा नष्‍ट केला पाहिजे’, इथपर्यंत येऊन पोचला आहे. तो भारतातील वर्ष २०२४ मधील निवडणुकांपर्यंत असाच चालू रहाणार आहे. हिंदु समाज त्‍याच्‍यावर होणार्‍या प्रच्‍छन्‍न आक्रमणाने पेटून उठत नाही, याची पुरेशी जाणीव इस्‍लाम आणि ख्रिस्‍ती धर्मियांना आहे. त्‍यामुळे जमेल तसे, मिळेल त्‍या मार्गाने ते सनातन हिंदु धर्मावर आघात करत असतात. हिंदु समाजाचे आत्‍मभान आणि स्‍वत्‍वाची जाणीव जागृत होऊ नये, याची पूर्ण काळजी नियोजनपूर्वक घेतली जाते. मग द्रविड विरुद्ध आर्य, उत्तर विरुद्ध दक्षिण, ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर, मराठा विरुद्ध ओबीसी, कधी मराठी अस्‍मिता तर कधी तमिळ, तेलगू, कानडी अशा आमच्‍यातच झुंजी लावून देत आमचे खच्‍चीकरण केले जाते. केवळ हिंदु धर्मातील चुकीच्‍या प्रथा परंपरा, ज्‍यांपैकी बर्‍याचशा आम्‍ही केव्‍हाच सोडून दिलेल्‍या आहेत, त्‍या पुन्‍हा पुन्‍हा आम्‍हालाच सांगितल्‍या जातात. लोकशाही, व्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य अन् अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य यांचा केवळ हिंदु धर्म आणि हिंदु समाजाच्‍याच विरोधात वापर केला जातो. त्‍यामुळे समस्‍त हिंदु समाजाने एकत्र आलेच पाहिजे; कारण या सगळ्‍याचा सोक्षमोक्ष लावण्‍याची वेळ नजीकच्‍या भविष्‍यकाळात आलेली आहे, यात शंका नाही. नुपूर शर्मांच्‍या वक्‍तव्‍याची गंभीर नोंद घेणारे देशाचे सर्वोच्‍च न्‍यायालय उदयनिधी स्‍टॅलीनच्‍या वक्‍तव्‍याला दखलपात्र समजत नाही. त्‍यामुळे या सामाजिक उदारतेचा पुनर्विचार करण्‍याची वेळ आलीच आहे.

– डॉ. विवेक राजे

(साभार : दैनिक ‘नागपूर तरुण भारत’, १३.९.२०२३)