कोल्हापूर – कोल्हापूर शहरास काळम्मावाडी धरणातून थेट वाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना पूर्ण झाली आहे. या योजनेतून शहरवासियांना पाणीपुरवठा करण्यास प्रारंभ झाला आहे. या योजनेतून नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासमवेत पाणीपट्टी दर न्यून व्हावा, अशी नागरिकांची मागणी आहे. त्यासाठी कोल्हापूर महापालिकेने पाणीपट्टी दर न्यून करण्याबाबत उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका प्रशासनास दिल्या. महानगरपालिकेच्या अखत्यारीत विविध विषयांवर १६ नोव्हेंबरला शासकीय विश्रामगृह येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त श्रीमती के. मंजूलक्ष्मी आणि महापालिका प्रमुख अधिकार्यांसमवेत आढावा बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या.
श्री. राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले, ‘‘कोल्हापूर शहर इतर शहरांच्या तुलनेत विकासापासून मागे पडत आहे. निधी संमत होऊनही कामे वेळेत चालू होत नाहीत. यामुळे कामे रखडली जातात. गांधी मैदान भुयारी गटारीचे काम, नगरोत्थान निधी अशी प्रमुख कामे निधी असूनही चालू झालेली नाहीत. शहर विकासाच्या दृष्टीने पादचारी उड्डाणपूल, पार्किंग व्यवस्था आदी सूत्रे बैठकीपुरतीच चर्चेला येतात. यावर पुढे कोणतीही कार्यवाही होत नाही. जनतेचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी प्रशासन आणि अधिकारी कटीबद्ध असतांना जनतेच्या आवश्यक कामांकडे दुर्लक्ष केले जात असल्यास त्यांची गय केली जाणार नाही.’’
यज्ञेश वार्ता आणि टंकलेखन – अजय केळकर