भूमीच्या आत दडलेले ४०० वर्षे प्राचीन शिवमंदिर खोदकामातून आले समोर ! 

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे चालू असलेल्या खोदकामात ४०० वर्षे जुने मंदिरच समोर आल्याची घटना समोर आली आहे. ही बातमी इन्स्टाग्रामवर ‘रिलिजियस सनातनी’ नावाच्या खात्यावरून व्हिडिओद्वारे प्रसारित झाली आहे. यानुसार काही कामगार या परिसरात खोदकाम करत असतांना त्यांना एक वस्तू लागली. संपूर्ण खोदकाम केले गेले, तेव्हा भूमीखाली नंदीची प्रतिमा सापडली. विशेष म्हणजे या नंदीच्या मुखातून सातत्याने पाणी खाली वाहत होते. हे पाणी कुठे वाहत जाते, हे पहाण्यासाठी आणखी खोदकाम केले असता खाली एक शिवलिंग असल्याचे आढळले. ही घटना काही वर्षांपासून घडली होती. त्यानंतर पुढे याचे खोदकाम चालू ठेवल्यावर आता संपूर्ण मंदिर समोर आले आहे. पुरातत्व विभागाने केलेल्या तपासणीनंतर लक्षात आले की, हे शिवमंदिर ४०० वर्षे जुने आहे. बेंगळुरू शहरातील ‘मल्लेश्वरम् लेआऊट’ भागाच्या कडू मल्लेश्वर मंदिराच्या समोर हे शिवमंदिर सापडले आहे. या मंदिराला ‘नंदी तीर्थ’, ‘नंदीश्वर तीर्थ’, ‘बसव तीर्थ’ किंवा केवळ ‘मल्लेश्वरम् नंदी गुढी’ असेही म्हणतात.