पंढरपूर येथील कार्तिक यात्रेच्‍या निमित्ताने २० नोव्‍हेंबरपासून वारकर्‍यांसाठी विशेष रेल्‍वे !

सोलापूर – पंढरपूर येथील कार्तिक यात्रेसाठी २० ते २७ नोव्‍हेंबर या कालावधीत मध्‍य रेल्‍वेकडून वारकर्‍यांसाठी विशेष रेल्‍वेगाड्या उपलब्‍ध करून देण्‍यात आल्‍या आहेत. लातूर-पंढरपूर ही गाडी २० नोव्‍हेंबरपासून सकाळी ७.३० वाजता लातूर येथून सुटेल आणि त्‍याच दिवशी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी पंढरपूर येथे पोचेल. ही गाडी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी पंढरपूर येथून सुटेल आणि लातूर येथे रात्री ७ वाजून २० मिनिटांनी पोचेल. पंढरपूर-मिरज या गाडीच्‍या ८ विशेष फेर्‍या होणार आहेत. सोमवारपासून प्रतिदिन सकाळी ९.२० वाजता ती पंढरपूर येथून निघून दुपारी १२.०५ वाजता मिरज येथे पोचेल. ही गाडी दुपारी १.१० वाजता मिरज येथून निघेल आणि सायंकाळी ५.०५ वाजता पंढरपूर येथे पोचेल.

कार्तिक यात्रेसाठी कोल्‍हापूर येथून अधिक गाड्या सोडा ! – रेल्‍वे प्रवासी संघ

कोल्‍हापूर – पंढरपूर येथे कोल्‍हापूर येथून मोठ्या संख्‍येने वारकरी जातात. त्‍यांना सध्‍या कोल्‍हापूर येथून जाण्‍यासाठी दुपारी ३ वाजता एकच गाडी असल्‍याने त्‍यांना मिरज येथे जावे लागते. तरी कोल्‍हापूर येथून पंढरपूरसाठी अधिकच्‍या गाड्या सोडाव्‍यात, अशी मागणी रेल्‍वे प्रवासी संघाचे श्री. शिवनाथ बियाणी यांनी केली आहे.

पंढरपूर येथील कार्तिक यात्रेसाठी दर्शनरांगेत यंदा १० ठिकाणी भाविकांसाठी विश्रांतीगृहे !

पंढरपूर – २३ नोव्‍हेंबरला असलेल्‍या कार्तिक एकादशी यात्रेच्‍या निमित्ताने मंदिर प्रशासन जोरात सिद्धता करत आहे. १० लाख वारकरी येण्‍याची शक्‍यता लक्षात घेऊन मंदिर समितीने गोपाळपूर येथे १० पत्राशेड उभारले आहेत. दर्शनरांग ७ किलोमीटरपर्यंत उभारण्‍यात येत आहे. या वेळी प्रथमच दर्शनरांगेत १० विश्रांतीशेड उभारण्‍यात आली असून रांगेत पाणी, आरोग्‍यसुविधा, स्‍वच्‍छतागृहेही उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहेत. या संदर्भात सोलापूरचे जिल्‍हाधिकारी कुमार आशीर्वाद सर्व व्‍यवस्‍थेवर लक्ष ठेवून असून त्‍यांनी सर्व विभागांची आढावा बैठक घेऊन आवश्‍यक त्‍या सूचना दिल्‍या आहेत. वृद्ध भाविकांना दर्शनरांगेत त्रास झाल्‍यास त्‍यांना वैद्यकीय कक्षात आणून उपचार देण्‍यात येतील. या भाविकांना कक्षात येतांना ‘टोकन’ देण्‍यात येण्‍यात येणार असून त्‍यांना त्‍यांच्‍या जागी परत दर्शनरांगेत जाता येणार आहे.