Goa Police Appeal : मद्यप्राशन केल्यानंतर वाहन चालवण्यापासून ग्राहकांना परावृत्त करा !

पोलिसांचे मद्यालय, ‘पब’ आणि ‘रेस्टॉरंट’ मालकांना आवाहन

गोवा पोलिसांचे आवाहन

पणजी, १७ नोव्हेंबर (वार्ता.) : ग्राहकांना मद्यप्राशनानंतर वाहन चालवण्यापासून परावृत्त करावे आणि त्याऐवजी सुरक्षिततेला प्राधान्य देऊन ‘कॅब’ सेवांचा वापर करण्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन गोवा पोलिसांनी हणजूण आणि शिवोली भागांतील मद्यालय, ‘पब’ आणि ‘रेस्टॉरंट’ मालक यांच्याकडे केली आहे. गोवा पोलिसांनी हणजूण आणि शिवोली परिसरातील मालकांची एक बैठक घेऊन या बैठकीत त्यांना हे आवाहन केले. या बैठकीला पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी मार्गदर्शन केले.

पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी

मद्यप्राशन करून वाहन चालवल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहे आणि या पार्श्वभूमीवर गोवा पोलीस अपघातांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी मद्यप्राशन करून कुणीही वाहन चालवत असल्यास तात्काळ त्याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्याचे आवाहन केले. (पोलीस पब, बार आणि रेस्टॉरंट मालकांना करत असलेले आवाहन प्रत्यक्ष कृतीत येणे शक्य आहे का ? व्यक्ती मद्यपानासाठी स्वतःचे वाहन घेऊन येणार आणि जातांना स्वतःचे वाहन तिथेच ठेवून भाड्याच्या कॅबमधून जाणार अन् नंतर शुद्धीवर आल्यावर स्वतःचे वाहन घेऊन जाणार. असा द्राविडी प्राणायाम मद्यपी करतील का ? – संपादक)