‘पनवेल, जिल्हा रायगड येथील कु. दुर्वा नित्यानंद भिसे (वय ७ वर्षे) हिचा उद्या १९.११.२०२३ (कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमी ) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे आई-वडील सौ. भक्ती भिसे आणि श्री. नित्यानंद भिसे यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढेे दिली आहेत.
‘वर्ष २०२१ मध्ये ‘कु. दुर्वा नित्यानंद भिसे उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१०.११.२०२३) |
कु. दुर्वा भिसे हिला ७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
सौ. भक्ती नित्यानंद भिसे (कु. दुर्वाची आई)
१. शाळेतील मैत्रिणींचे प्रबोधन करणे
अ. कु. दुर्वा शाळेतील मैत्रिणींना त्यांच्या आई-वडिलांना ‘मम्मी-डॅडी’ म्हणण्यापेक्षा ‘आई-बाबा’, असे म्हणायला सांगते. तिच्या मैत्रिणी चुकीचे बोलत असतील, तर दुर्वा त्यांना समजावून सांगते.
आ. ती शाळेतील मैत्रिणींना ‘मनोरा’मुद्रा (टीप) करून शरिरावरील अनिष्ट शक्तीचे आवरण काढण्यास सांगते आणि नामजप करण्यास सांगते.
(टीप – ‘मनोरा’मुद्रा : दोन्ही हातांची मधली बोटे एकमेकांना जोडून हाताची ‘मनोर्या’प्रमाणे मुद्रा करणे आणि ती डोक्यापासून मूलाधारचक्रापर्यंत वरून खाली अन् खालून वर अशी फिरवणे)
२. प्रतिदिन नामजप लिहिणे
ती ‘निर्विचार’, ‘महाशून्य’ आणि ‘शून्य’, हे जप लिहिते. ती प्रतिदिन वहीचे एक पान ‘निर्विचार’ आणि एक पान ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप लिहिते.
३. सात्त्विकतेची ओढ
अ. देवद आश्रमात ‘श्री दक्षिणामूर्ती यज्ञ’ झाला होता. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या उपस्थित होत्या. यज्ञ झाल्यावर आम्ही यज्ञकुंडाचे दर्शन घेतले. तेव्हा कु. दुर्वा मला म्हणाली, ‘‘आई किती सुंदर ! रामनाथी आश्रमाप्रमाणेच येथे पुष्कळ चैतन्य आहे.’’
आ. आश्रमातील यज्ञाचे दर्शन घेऊन आल्यावर कु. दुर्वा एके ठिकाणी वाढदिवसाला गेली. घरी आल्यावर त्याविषयी मी तिला विचारले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘मला वाढदिवसाच्या ठिकाणी थांबू नये’, असे वाटले. तेथे काहीच चैतन्य नव्हते. सगळीकडे आवरण होते.’’
४. आश्रमात जाण्याची ओढ
काही कारणास्तव मला २ – ४ दिवस दुर्वाला घेऊन देवद आश्रमात जाणे जमले नाही, तर तिला अस्वस्थ वाटते आणि ती मला आश्रमात घेऊन जाण्यास सांगते. तिला आश्रमापासून अधिक दिवस दूर रहाणे आवडत नाही.’
५. चुकांविषयी गांभीर्य असणे
दुर्वा देवद आश्रमातील फलकावर चूक लिहिते. तिला ८ – ९ मासांपूर्वी अक्षर ओळख नव्हती, त्यामुळे मराठी वाचता येत नव्हते, तरीही ती ‘मला फलकावर चूक लिहायची आहे’, असा हट्ट धरायची. मी तिला कागदावर चूक लिहून द्यायचे आणि ते बघून ती फलकावर चूक लिहू लागली. आता तिला अक्षर ओळख झाली आहे. त्यामुळे ती फलकावर नियमितपणे चूक लिहिते.’
श्री. नित्यानंद वसंत भिसे (कु. दुर्वाचे वडील)
१. ‘दुर्वा बाहेर जातांना दुचाकीवर बसता क्षणी मला जयघोष करण्याची आठवण करते.
२. शाळेत जाता-येता नामजप करणे
दुर्वा प्रतिदिन सकाळी शाळेत जातांना आणि शाळेतून येतांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करते आणि मलाही नामजप करायला सांगते. एखाद्या दिवशी मी नामजप करायला विसरलो, तर दुर्वा मला आठवण करून देते.
३. चूक झाल्यावर स्वीकारणे आणि प्रायश्चित्त घेणे
दुर्वाला एखादी चूक सांगितली की, ती लगेच स्वीकारून क्षमा मागते. एकदा तिने मोठी चूक केली; म्हणून तिला ‘आठवडाभर बाहेरचा खाऊ खायचा नाही’, असे प्रायश्चित्त घ्यायला सांगितले होते. तेव्हा ती बाजारात गेल्यावरही खाऊ मागत नव्हती. त्या वेळी ती ‘माझे प्रायश्चित्त आहे,’ असे सांगत होती.’