क्रिकेट जिहाद ?

संपादकीय

अब्दुल रज्जाकने जेव्हा ऐश्वर्या बच्‍चनवर अभद्र टिपणी केली तेव्हा शेजारी बसलेले दोन्ही माजी क्रिकेटपटू हसून टाळ्या वाजवत होते !

कराची येथील ‘मॅरियट’ हॉटेलमध्‍ये एका कार्यक्रमात बोलतांना पाकिस्‍तानचा माजी क्रिकेटपटू अब्‍दुल रज्‍जाक याने ‘पाकिस्‍तान क्रिकेट मंडळा’ची तुलना भारतीय अभिनेत्री ऐश्‍वर्या बच्‍चन यांच्‍याशी करतांना अत्‍यंत हीन दर्जाचे विधान केले. रज्‍जाकने ‘तुम्‍ही असे समजत असाल की, मी ऐश्‍वर्या यांच्‍याशी विवाह केल्‍याने होणारी मुले प्रामाणिक आणि चांगली असतील, तर असे होणार नाही; कारण त्‍यापूर्वी तुम्‍हाला तुमचा हेतू नीट करायला हवा’, असे विधान करून पाकिस्‍तानी खेळाडूंची मनोधारणा किती विकृत आहे ?, तेच सिद्ध केले आहे. दुसर्‍या एका घटनेत पाकिस्‍तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम उल् हक याने भारताचा गोलंदाज हरभजन सिंह यांच्‍याविषयी म्‍हटले होते की, ‘हरभजन एकदा इस्‍लाम धर्म स्‍वीकारण्‍याचा विचार करत होता. मौलाना तारिक जमील यांना भेटल्‍यावर त्‍याने मुसलमान होण्‍याचा विचार केला होता.’ अर्थात् हरभजन सिंह यांनी हे विधान फेटाळून लावत ‘मला भारतीय आणि शीख असल्‍याचा अभिमान असून हे लोक कोणती ‘नशा’ करून अशी विधाने करतात ?’, असा प्रतिप्रश्‍न करत चोख प्रत्‍युत्तर दिले. ‘खेळ हा खेळच असतो, त्‍याला कोणत्‍या धर्माशी जोडून नका’, असे विधान नेहमीच निधर्मी आणि पुरोगामी करतात; मात्र पाकिस्‍तानसाठी राजकारण असो, साहित्‍य असो किंवा खेळ, ते प्रत्‍येक वेळी ‘धर्म प्रथम’ हाच दृष्‍टीकोन ठेवतात, हेच या निमित्ताने समोर आले.

पाकची जुनी खोड !

वर्ष १९७८ मध्‍ये आशियाई क्रीडा स्‍पर्धेतील हॉकीच्‍या अंतिम सामन्‍यात पाकिस्‍तानने भारताचा १-० अशा गोलफरकाने पराभव केला होता. या विजयानंतर पाकच्‍या काही खेळाडूंनी मैदानावर नमाजपठण केले होते. त्‍या वेळी संपूर्ण जगासाठी ही नवीन गोष्‍ट होती; कारण तोपर्यंत मैदानावर कधी कुठल्‍या खेळाडूने अशा प्रकारे नमाजपठण केले नव्‍हते. विशेष म्‍हणजे त्‍या वेळी या घटनेची चर्चा झाली; मात्र एकाही देशाने त्‍याला विरोध केला नाही. वर्ष १९८२ मध्‍ये पाकिस्‍तानचे तत्‍कालीन कर्णधार इम्रान खान यांना जेव्‍हा ‘भारत-पाकिस्‍तान यांच्‍यातील सामन्‍यांकडे तुम्‍ही कसे पहाता ?’, असे विचारले असता ते म्‍हणाले होते, ‘‘जेव्‍हा मी भारताविरुद्ध खेळतो, तेव्‍हा मी त्‍याला खेळ मानत नाही. मी काश्‍मीरचा विचार करतो आणि त्‍याला जिहाद मानतो.’’ यावरून हे लक्षात येते की, ४० वर्षांपासूनच पाकिस्‍तानचे खेळाडू भारताविरुद्धच्‍या सामन्‍याकडे खेळ म्‍हणून नाही, तर धर्मयुद्ध म्‍हणून पहातात. ‘भारताविरुद्ध सामना जिंकणे, म्‍हणजे हिंदूंवर विजय मिळवण्‍यासारखेच आहे’, अशीच पाकिस्‍तानी खेळाडूंची दृष्‍टी असते.

पाकिस्‍तान क्रिकेट संघातील माजी हिंदु गोलंदाज दानिश कनेरिया यांनी ते हिंदु असल्‍याने त्‍यांना कशा प्रकारे त्रासाला सामोरे जावे लागले ?, हे नुकतेच सांगितले. पाकिस्‍तानचा तत्‍कालीन कर्णधार शाहिद आफ्रीदी याने दानिश यांच्‍यावर वारंवार धर्म पालटण्‍यासाठी दबाव आणला होता, तसेच दानिश यांच्‍यावर विविध पाकिस्‍तानी खेळाडूंकडून नमाजपठणासाठी दबाव आणला जात असे. असे करण्‍यास नकार दिल्‍यामुळे दानिश चांगल्‍या प्रकारे खेळत असूनही त्‍यांच्‍यावर विविध आरोप करून त्‍यांना क्रिकेट खेळण्‍यापासून वंचित ठेवण्‍यात आले. वर्ष २०१४ मध्‍ये पाकिस्‍तानी खेळाडू वसीम जाफर याने श्रीलंकेचा फलंदाज तिलकरत्ने याच्‍यावर इस्‍लाम स्‍वीकारण्‍यासाठी दबाव आणला होता. यावरून ‘जगात कुठेही गेले, तरी पाकिस्‍तानचे खेळाडू क्रिकेटच्‍या नावाखाली इस्‍लामचाच प्रचार करतात’, हेच समोर येते आणि हाच ‘क्रिकेट जिहाद’ आहे !

मैदानावर नमाजपठण करणारे पाकचे खेळाडू

भारतीय क्रिकेट संघातही मुसलमान खेळाडू आहेत; मात्र ते कधीही क्रिकेटच्‍या मैदानात नमाजपठण करत नाहीत. याउलट पाकिस्‍तानचे खेळाडू तसे करून ते इस्‍लामशी एकनिष्‍ठ असल्‍याचे जाणीवपूर्वक बिंबवण्‍याचा प्रयत्न करतात. विश्‍वचषक क्रिकेट स्‍पर्धेत भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यात पहिला सामना वर्ष १९९२ मध्‍ये खेळला गेला. त्‍या वेळी पाकिस्‍तान क्रिकेट संघ भारताकडून पराभूत झाला होता. यानंतर अंतिम सामन्‍यात पाकने इंग्‍लंडचा पराभव केल्‍यावर पाकिस्‍तानचा अमीर सोहेल, मोईन खान आणि रमीझ राजा या खेळाडूंनी मैदानात नमाजपठण केले होते. त्‍यांपैकी रमीझ राजा पुढे पाकिस्‍तान क्रिकेट मंडळाचा अध्‍यक्ष झाला. पाकिस्‍तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस याने एका कार्यक्रमात पाकिस्‍तानचा यष्‍टीरक्षक महंमद रिझवान याला भारताविरुद्धच्‍या सामन्‍यानंतर हिंदूंसमोर नमाजपठण करतांना पाहून आनंद व्‍यक्‍त केला होता. ‘उत्तराखंडामधील क्रिकेट असोसिशन’ने वसीम जाफर याची एका हंगामासाठी मुख्‍य प्रशिक्षक म्‍हणून नियुक्‍ती केली होती. जाफरने तेथे ‘क्रिकेट जिहाद’ करून उत्तराखंडामधील मुसलमान खेळाडूंना प्रोत्‍साहन दिल्‍याचा आरोप झाल्‍याने त्‍याला त्‍यागपत्र द्यावे लागले होते. वकार युनूस, शोएब अख्‍तर, इंझमाम उल् हक ही कट्टरतावादाची ठळक उदाहरणे आहेत. इंझमाम उल् हक आता मौलाना झाला असून त्‍याने एखाद्या संघाचा प्रशिक्षक म्‍हणून नाही, तर धर्माचा प्रचारक म्‍हणून काम करणे पसंत केले.

आता ‘रज्‍जाक याने भारतीय अभिनेत्री ऐश्‍वर्या बच्‍चन यांच्‍याविषयी अत्‍यंत गंभीर विधान करूनही भारतीय महिला आयोग गप्‍प का ?’, असा प्रश्‍न कुणाच्‍याही मनात निर्माण होऊ शकतो. यासह या विधानाचा एकाही भारतीय खेळाडूने निषेध केला नाही. कथित ‘सेक्‍युलर’, विचारवंत आदींनीही यावर प्रतिक्रिया व्‍यक्‍त केलेली नाही, हे आश्‍चर्यकारक आहे.

पाकिस्‍तानशी खेळण्‍यावर बहिष्‍कारच हवा !

वर्ष २००८ मध्‍ये मुंबईवर झालेल्‍या आतंकवादी आक्रमणानंतर भारताने पाकिस्‍तानशी क्रिकेट खेळणे बंद केले होते. आताही भारताशी थेट युद्ध करता येणे शक्‍य नसल्‍याने पाकचे क्रिकेटपटूही विविध प्रसंगांमधून भारताची मानहानी करण्‍याची एकही संधी सोडत नाहीत, तसेच भारतीय खेळाडूंना इस्‍लामच्‍या जाळ्‍यात ओढण्‍याचा प्रयत्न करत आहेत. त्‍यामुळे यापुढील काळात पाकिस्‍तानच्‍या ‘क्रिकेट जिहाद’ला पाकिस्‍तानशी क्रिकेट खेळण्‍यावर कायमस्‍वरूपी बहिष्‍कार घालणे, हेच योग्‍य उत्तर ठरेल !

खेळाकडेही ‘जिहाद’ म्‍हणून पहाणार्‍या पाकिस्‍तानी क्रिकेट संघावर बहिष्‍कारच घालायला हवा !