छत्रपती संभाजीनगर – जालना जिल्ह्यातील अंबड येथे १७ नोव्हेंबर या दिवशी ओबीसी आणि भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेला छगन भुजबळांसह भाजपच्या नेत्या सौ. पंकजा मुंडे पालवे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, आमदार महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ‘मुस्लिम ओबीसी संघटने’चे शब्बीर अन्सारी यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
याविषयी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ओबीसी नेत्यांची सभा अंबड येथे आहे. मराठा आरक्षणासाठी आमचे आंदोलन अंंतरवाली सराटी येथे चालू आहे. अंबड हे अंतरवाली सराटीपासून ३० ते ४० किलोमीटर दूर आहे. त्यामुळे त्यांच्या सभेने आम्हाला काही फरक पडणार नाही. त्यांच्या सभेशी आम्हाला काही देणे-घेणेही नाही. आम्ही आमची लढाई लढत आहोत.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गोरगरीब मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास सामान्य ओबीसींचा विरोध नाही. केवळ ओबीसी नेते आपल्या राजकीय लाभासाठी आम्हाला विरोध करत आहेत.धनगर समाजाला विशेष प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीचे मीही समर्थन केले आहे.