दोडामार्ग : तालुक्यातील आडाळी औद्योगिक क्षेत्रातील (‘एम्.आय.डी.सी.’तील) भूखंड उद्योजकांना देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या अंतर्गत १० नोव्हेंबर या दिवशी ४ उद्योजकांना भूखंडाचे वाटप करण्यात आले.
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’ला वर्ष २०१३ मध्ये मान्यता मिळाली होती. स्थानिकांनीही सकारात्मक राहून शासनाला भूमी हस्तांतरित केल्या होत्या; मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे याची पुढील प्रक्रिया रखडली होती. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये येथील भूखंड उद्योजकांसाठी खुले करण्यात आले; मात्र त्याची वितरण प्रक्रिया बराच काळ रखडली होती. येथील भूखंडांची विक्री लवकर करून ‘एम्.आय.डी.सी.’त उद्योग आणि व्यवसाय चालू झाल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी मागणी सातत्याने केली जात होती. अखेर २० ऑगस्ट २०२३ या दिवशी स्थानिक कृती समितीने आडाळी ते बांदा, असा मोठा मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर भूखंड वाटप प्रक्रियेला गती आली होती. १० नोव्हेंबर या दिवशी ‘एम्.आय.डी.सी.’च्या अधिकारी दर्शना एकावडे यांनी ४ भूखंड संबंधित उद्योजकांना सुपुर्द केले. या वेळी कृती समितीच्या वतीने पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.