गोवा : नूतनीकरण केलेल्या कला अकादमीचे उद्घाटन 

डिसेंबरपासून कार्यक्रमांची रेलचेल

डावीकडून दुसरे मंत्री नीलेश काब्राल, दीपप्रज्वलन करतांना मुख्यमंत्री डॉ. सावंत, क्रीडामंत्री गोविंद गावडे आणि इतर मान्यवर

पणजी, १० नोव्हेंबर (वार्ता.) : नूतनीकरणाच्या कामासाठी मागील ३ वर्षे बंद असलेल्या कला अकादमीचे १० नोव्हेंबर या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘कला अकादमी नूतनीकरणाच्या कामासाठी बंद असल्याचा फटका कलाकारांना बसला; मात्र आता कला अकादमीचे लोकार्पण झालेले असल्याने ही वास्तू कलाकारांनी नवीन उत्साहाने तेजोमय करावी. ‘कला अकादमीच्या रंगमंचावर सादरीकरण करण्याची संधी मिळावी’, असे प्रत्येक कलाकाराला वाटत असते. डिसेंबरपासून कला अकादमी कार्यक्रमांसाठी खुली असणार आहे.’’

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले, ‘‘मागील ३ वर्षे कलाकारांना त्रास झाल्याने मी दिलगिरी व्यक्त करतो. कला अकादमीचा नूतनीकरणाचा निर्णय योग्यच होता, असे आता अकादमीचा नवीन साज पाहून वाटत आहे.’’ सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल म्हणाले, ‘‘कला अकादमी आता ३६५ दिवस कलाकार आणि कलाप्रेमी यांच्यासाठी खुली असणार आहे. पुढील ५ वर्षे या वास्तूच्या देखभालीचे दायित्व कंत्राटदाराचे आहे.’’