राज्‍यातील खासगी महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचारी यांच्‍या वेतनाच्‍या कागदपत्रांची पडताळणी करणार !

शुल्‍क नियामक प्राधिकरणाची माहिती !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – राज्‍यातील व्‍यावसायिक अभ्‍यासक्रमांच्‍या खासगी महाविद्यालयातील शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी यांना वेतन योग्‍य पद्धतीने मिळत नसल्‍याच्‍या तक्रारी येतात. त्‍यामुळे त्‍या महाविद्यालयांची शुल्‍क निश्‍चिती, प्रस्‍तावासह शिक्षक, कर्मचार्‍यांच्‍या वेतनाची कागदपत्रे आता सादर करावी लागणार आहेत, अशी शुल्‍क नियामक प्राधिकरणाकडून (‘एफ्.आर्.ए.’कडून) त्‍यासंबंधीची पडताळणी केली जाणार आहे. राज्‍यातील २ सहस्रांहून अधिक विविध शाखांची महाविद्यालये आहेत. त्‍यांचे शिक्षण शुल्‍क निश्‍चित केले आहे; परंतु काही महाविद्यालये मनमानी पद्धतीने अधिकचे शुल्‍क आकारतात, असे निदर्शनास येत आहे. त्‍यावर बंधन आणण्‍यासाठी वर्ष २०२४-२५ साठी शुल्‍क निश्‍चितीसंदर्भात ‘एफ्.आर्.ए.’ने नियमावली सिद्ध केली आहे. त्‍याचे परिपत्रक संकेतस्‍थळावर प्रसिद्ध केले आहे. सर्व प्रकरणांतील कागदपत्रांची पडताळणी शुल्‍क नियामक प्राधिकरणाकडून करण्‍यात येणार आहे.