१. अंतर्मुखता वाढवण्यासाठी प्रयत्न करता न आल्यामुळे निराशा येणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर भावजागृतीचा प्रयोग सुचणे
‘काही दिवसांपूर्वी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मला ‘अंतर्मुखता वाढवण्यासाठी प्रयत्न कर’, असे सांगितले होते; परंतु माझ्या बहिर्मुखतेची तीव्रता एवढी होती की, माझे साधकांच्या बोलण्याकडे लक्ष जाऊन मला काही प्रसंगांमुळे पुष्कळ निराशा आली होती. ‘काहीच करू नये’, असे मला वाटत होते. मी नामजपादी उपायांना बसल्यावर प्रार्थना करत होते, ‘देवा, मला अंतर्मुख होता येऊ दे.’ त्या वेळी देवाने मला भावजागृतीचा पुढील प्रयोग सुचवला.
२. भावजागृतीचा प्रयोग करतांना त्यात रथारूढ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन होणे
‘मी एका ठिकाणी बसले होते. माझ्या आजूबाजूला बरेच साधक होते. त्या वेळी मी एका लहान बालिकेच्या रूपात होते. मला आध्यात्मिक त्रास होत होता. मी थकून तिथेच बसले होते. मला ‘कुठे आणि कसे जायचे ?’, याविषयी काहीच सुचत नव्हते. मी सूक्ष्मातून परम पूज्यांना सांगत होते, ‘परम पूज्य, आता या ना लवकर. मला त्रास सहन होत नाही.’ मी हे त्यांना सांगत असतांनाच माझ्या डोळ्यांवर प्रकाशाचा झोत आला; म्हणून मी डोळे उघडले. तेव्हा समोरील पडदा दूर झाला आणि त्यामागे रथारूढ असलेले तिन्ही गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) मला दिसले. त्यांना पहाताच मला पुष्कळ आनंद झाला. मी उठून उभी राहिले.
३. आई बाळाला कुशीत घेते, त्याप्रमाणेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधिकेच्या बालरूपाला उचलून घेणे
आई जसे बाळाला घेण्यासाठी दोन्ही हात पुढे करते, अगदी तसेच तिन्ही गुरूंनी मला घेण्यासाठी हात पुढे केले. त्यांना पाहिल्यावर मी आजूबाजूचे सर्व विसरले. मी त्यांच्या दिशेने माझी छोटी छोटी पावले टाकत धावत निघाले. मी रथाच्याजवळ पोचले; पण मला रथात जाण्याचा मार्ग दिसत नव्हता. तेव्हा मला तेथे काही पायर्या दिसल्या. मी अगदी लहान असल्याने त्या पायर्या चढू शकत नव्हते. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी मला हाताला धरून पायर्यांवरून चढवले आणि परम पूज्यांच्या चरणांजवळ नेले. मी हळूच गुरुमाऊलींच्या चरणांना स्पर्श करून त्यांच्या चरणांवर माझे डोके टेकवले. तेव्हा परम पूज्यांनी मला उठवले आणि आईने बाळाला उचलून कडेवर घ्यावे, त्याप्रमाणे त्यांनी मला उचलून घेतले.
४. भावजागृतीचा प्रयोगानंतर आनंदी आणि उत्साही वाटणे
भावजागृतीचा प्रयोग अनुभवल्यानंतर माझ्या स्थितीत लगेच सुधारणा झाली. माझे मन आनंदी आणि उत्साही झाले. या स्थितीतून बाहेर आल्यावर या प्रयोगाचा देवाने मला पुढील अर्थ सांगितला. ‘अंतर्मुखता म्हणजेच गुरूंचे चरण अनुभवणे’, असे आहे आणि ते साध्य करण्यासाठी तू तळमळीने प्रयत्न कर.’
‘हे गुरुमाऊली, अंतर्मुखता साध्य करण्यासाठी मला सातत्याने आणि चिकाटीने प्रयत्न करण्याचे बळ अन् प्रेरणा तुम्हीच द्या. तुम्हीच हे प्रयत्न करवून घेऊन मला तुमच्या चरणी घ्या’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |