१५ नोव्‍हेंबरपासून महाराष्‍ट्र दौरा, १ डिसेंबरपासून गावागावांत साखळी उपोषण !

मनोज जरांगे यांच्‍याकडून आंदोलनाच्‍या तिसर्‍या टप्‍प्‍याची घोषणा !

मनोज जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षणाच्‍या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी ९ नोव्‍हेंबर या दिवशी आंदोलनाच्‍या तिसर्‍या टप्‍प्‍याची घोषणा केली. १५ ते २५ नोव्‍हेंबरपर्यंत महाराष्‍ट्राचा दौरा करणार असून यात मराठा समाजबांधवांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती मनोज जरांगे यांनी ९ नोव्‍हेंबर या दिवशी येथे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत दिली. त्‍यांच्‍यावर सध्‍या छत्रपती संभाजीनगर येथील रुग्‍णालयात उपचार चालू आहेत.

मनोज जरांगे पाटील पुढे म्‍हणाले की,

१. मराठा आंदोलनाचे आम्‍ही एकूण ७ टप्‍पे पाडले आहेत. प्रथम पश्‍चिम महाराष्‍ट्रातील मराठा बांधवांशी मी प्रामुख्‍याने संवाद साधणार आहे. चौथ्‍या टप्‍प्‍यात विदर्भाचा दौरा आणि त्‍यानंतर कोकण अन् राहिलेल्‍या मराठवाड्यात जाणार आहे.

२. १ डिसेंबरपासून राज्‍यातील प्रत्‍येक गावात मराठा समाजाने ‘साखळी उपोषण’ चालू करावे. यासाठी आतापासूनच कामाला लागावे.

३. काही जण आमच्‍या नावावर मराठा समाजाकडून पैसे गोळा करत आहेत. दौर्‍यासाठी आम्‍ही कुणाकडूनही १ रुपयाही घेत नाही. त्‍यामुळे कुणीही पैसे देऊन फसू नये. आमच्‍या नावावर पैसे घेतल्‍याचे कळले, तर त्‍याला सोडणार नाही.

४. मराठा समाजाला आरक्षण मिळण्‍याची प्रक्रिया चालू झाली आहे. २४ डिसेंबरपर्यंतची समयमर्यादा घालून दिली आहे. असे असतांना तुम्‍ही (तरुण) आत्‍महत्‍या का करत आहात ? २४ डिसेंबरपर्यंत निर्णय न झाल्‍यास पुढील लढाईसाठी तुमची आवश्‍यकता आहे. त्‍यामुळे कुणीही आत्‍महत्‍या करू नये.