कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचे महाराष्ट्रातील प्रमुख साडेतीन शक्तीपिठांपैकी एक महत्त्वपूर्ण शक्तीपीठ आहे. प्रत्येक वर्षी ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी या तीन दिवसांमध्ये देवीचा उत्तरायणातील किरणोत्सव असतो, तसेच दक्षिणायनात ९, १० आणि ११ नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये देवीचा दक्षिणायनातील किरणोत्सव असतो. या सोहळ्याच्या वेळी मावळतीचे सूर्यकिरण महाद्वारातून श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात प्रवेश करून पहिल्या दिवशी तिचे चरण, दुसर्या दिवशी तिचे पोट आणि छाती अन् तिसर्या दिवशी तिचे मुख आणि तदनंतर संपूर्ण मूर्ती यांना स्पर्श करतात. सूर्यकिरणाने देवीच्या मूर्तीला स्पर्श करण्याच्या आधी मंदिरातील सर्व विद्युत् दीप मालवून मंदिराच्या गाभार्यात केवळ दोन समया तेवत ठेवल्या जातात. वर्षातून दोन वेळा होणार्या या किरणोत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व येथे लेखबद्ध केले आहे.
१. ‘किरणोत्सव’ म्हणजे ‘ज्योतीने तेजाची आरती’ करण्याप्रमाणे असणे
सर्व देवतांची तत्त्वे पंचतत्त्वांनी युक्त असतात. देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा यांच्यामध्ये देवतेची पंचमहाभूतांपैकी पृथ्वी आणि आप ही तत्त्वे अधिक प्रमाणात असून ती सगुण स्तरावर कार्यरत असतात. देवतेच्या मूर्तीमधील देवतेचे मूलतत्त्व जागृत करण्यासाठी देवतेच्या मूर्तीवर विविध पूजा-उपचार केले जातात. ज्याप्रमाणे मनुष्य देवतेच्या मूर्तीवर विविध धार्मिक विधींच्या अंतर्गत पूजा-उपचार करतात, त्याप्रमाणे निसर्गरूपी पंचमहाभूतांची मूलतत्त्वे देवतांची आराधना करत असतात. या नैसर्गिक आराधनेच्या अंतर्गत मंदिरातील देवतेच्या मूर्तीवर सूर्यनारायण तेजतत्त्वाच्या किरणांचा वर्षाव करून देवतेच्या चरणी सूर्यकिरणरूपी शुद्ध तेजतत्त्व अर्पण करून देवतेची आराधना करत असतो. त्यामुळे श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात होणारा ‘किरणोत्सव’ म्हणजे ‘ज्योतीने तेजाची आरती’ करण्याप्रमाणे ‘ज्योतसे ज्योत जगाओ’, म्हणजे तेजाने तेजाची वृद्धी करण्याची प्रक्रिया होत असते.
२. ‘किरणोत्सव’, म्हणजे ‘देवतेच्या मूर्तीची तेजतत्त्वाच्या स्तरावरील शुद्धीकरणाची प्रक्रिया’ आणि ‘तत्त्वजागृती’ सोहळा असणे
‘किरणोत्सव’, म्हणजे सूर्यनारायणाच्या दिव्य तेजाने देवतेच्या मूर्तीची केलेली तेजतत्त्वाच्या स्तरावरील शुद्धीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया आहे’, असे आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे ‘किरणोत्सवामुळे’ देवतेच्या मूर्तीतील देवतेचे तत्त्व जागृत होत असल्याने ‘किरणोत्सवाला’ ‘तत्त्वजागृती सोहळा’, असेही म्हणू शकतो.
३. देवतेच्या किरणोत्सवाचा सोहळा हा भाव आणि भक्ती वृद्धींगत करणारा दिव्य सोहळा असणे
जेव्हा सूर्यकिरण देवतेच्या चरणांवर पडतात, तेव्हा भक्तामध्ये देवतेच्या चरणांप्रतीचा आदरभाव वाढून त्याला देवतेला शरण जाण्याची प्रेरणा मिळून त्याचा शरणागतभाव जागृत होतो. जेव्हा सूर्यकिरण देवतेच्या पोटापासून छातीपर्यंत या भागात पडतात, तेव्हा देवतेचे अनाहतचक्र जागृत होऊन देवतेच्या हृदयात भक्तांविषयी प्रीती जागृत होते. अशा प्रकारे भगवंताचे वात्सल्य अनुभवल्यावर भक्तांचाही भगवंताप्रतीचा बालकभाव किंवा भोळाभाव जागृत होतो. त्याचप्रमाणे जेव्हा सूर्यकिरण देवतेच्या मुखमंडलावर पडतात, तेव्हा देवतेचे मुखमंडल उजळून निघते आणि देवतेच्या मुखावर विविध प्रकारचे भाव उमटतात. ते पाहून भक्ताच्याही मनात भगवंताप्रतीचे विविध भाव उमटतात आणि तो देवतेच्या सुंदर रूपाचे ध्यान करत रहातो. अशा प्रकारे किरणोत्सवाचा मंगलमय उत्सव पहात असतांना भक्त भगवंताच्या जागृत झालेल्या तत्त्वाची अनुभूती घेत असतांना भक्त भगवंताच्या तत्त्वाशी तादात्म्य पावून त्याच्या दिव्यत्वाशी काही क्षण एकरूप झाल्याची दिव्य अनुभूती घेतो. त्यामुळे देवतेच्या किरणोत्सवाचा सोहळा हा भाव आणि भक्ती वृद्धींगत करणारा दिव्य सोहळा आहे.
४. श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सव चालू असतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया
टीप १ – भाविकामध्ये अव्यक्त भाव असेल, तर त्याच्यामध्ये नवविधाभक्तींपैकी एखादी भक्ती जागृत होते.
टीप २ – भाविकामध्ये व्यक्त भावाचे प्रमाण अधिक असेल, तर त्याच्या प्रकृतीनुरूप संबंधित भाव जागृत होतो, उदा. भाविकाची व्यष्टी प्रकृती असेल, तर त्याच्यामध्ये तारकभाव आणि समष्टी प्रकृती असेल, तर त्याच्यामध्ये मारकभाव जागृत होतो.
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.११.२०२३) (क्रमशः)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/736344.html
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. |