नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांचे विधान
पणजी : फेरीबोटीत वाहनांसाठी आकारलेल्या शुल्काविषयीची धारिका मी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पुढे दिली होती. मुख्यमंत्र्यांनी याविषयी स्पष्टीकरण मागितल्यावर राज्याला महसूल मिळावा आणि लोकांना चांगली फेरीसेवा मिळावी, यासाठी हे शुल्क लागू करण्यात आल्याचे मी त्यांना सांगितले आहे. ‘फेरीसाठी नागरिक १५० रुपये देऊ शकत नाहीत’, असे त्यांना वाटते, तर मला कोणतीही अडचण नाही. मुख्यमंत्र्यांना शुल्काविषयी योग्य तो निर्णय घेण्यास सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे.
(सौजन्य : Prudent Media Goa)
ते पुढे म्हणाले की, भाडेवाढीला विरोध करणार्या आमदारांना नवीन भाडे कसे न्याय्य आहे ? हे पटवून देण्याचा मी प्रयत्न केला आहे. फेरीसेवेच्या माध्यमातून राज्याला ७० लाख रुपयांचा महसूल मिळत असला, तरी या सेवेसाठी ४० ते ४५ कोटी रुपये खर्च होतो. ‘विरोधी पक्षांतील नेते नवीन भाडेवाढीला करत असलेला विरोध हा राजकीय हेतूने प्रेरित आहे’, असाही आरोप मंत्री फळदेसाई यांनी केला.