कुणालाही कोणत्याही विचारसरणीला नष्ट करण्याचा अधिकार नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

सनातन धर्माला नष्ट करण्याचे विधान करणारे उदयनिधी स्टॅलिन आणि पी.के. शेखर बाबू यांच्यावर कारवाई न केल्यावरून पोलिसांना फटकारले !

उदयनिधी स्टॅलिन

चेन्नई ( तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून उदयनिधी स्टॅलिन आणि पी.के. शेखर बाबू यांच्या विरोधात कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कोणत्याही व्यक्तीला फुटीरतावादी विचारांना चालना देण्याचा किंवा कोणत्याही विचारधारेचा नायनाट करण्याचा अधिकार नाही. सत्तेत बसलेल्या व्यक्तीने दायित्वाने वागले पाहिजे. त्यांनी अशा प्रकारच्या विचारांचा प्रसार करू नये, जी विचारसरणी जात आणि धर्म यांच्या नावाखाली लोकांमध्ये दरी निर्माण करते, ती विचारसरणी सार्वजनिकरित्या मांडण्याऐवजी ते (उदयनिधी) राज्यातील अंमली पदार्थांच्या समस्येचे उच्चाटन करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतात.

द्रविड विचारसरणीच्या विरोधातील सभेला न्यायालयाने अनुमती नाकारली !

या वेळी न्यायालयाने द्रविड विचारसरणीच्या विरोधात सभा घेण्यासाठी अनुमती नाकारली. या संदर्भात न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. सप्टेंबर मासामध्ये या सभेसाठी अनुमती मागण्यात आली होती. स्टॅलिन यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात येणार होती.

सनातनला नष्ट करण्याच्या गोष्टी करणार्‍यांनी अमली पदार्थ, भ्रष्टाचार आणि अस्पृश्यता नष्ट करण्यावर काम करावे !

न्यायालयाने म्हटले की, न्यायालय अशा कोणत्याही सभेला अनुमती देणार नाही, ज्यामुळे लोकांमध्ये फूट पडेल. या देशात वेगवेगळ्या विचारसरणी एकत्र नांदतात, जी भारताची ओळख आहे. जे लोक सनातनला नष्ट करण्याच्या गोष्टी करतात, त्यांनी अमली पदार्थ, भ्रष्टाचार आणि अस्पृश्यता नष्ट करण्यावर काम केले पाहिजे. येथे एक सभा आयोजित करण्यात आली, त्यात सनातन धर्माला नष्ट करण्याचे विधान करण्यात आले. यात सहभागी लोकांवर पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे येथे द्रविड विचारसरणीला नष्ट करण्यासाठी सभेची अनुमती मागितली जात आहे. यातून समाजामध्ये फूट पडेल.

  • मद्रास उच्च न्यायालयाच्या विधानांनंतरही स्टॅलिन त्यांच्या विधानावर ठाम !

  • (म्हणे) ‘सनातन धर्माला विरोध करत राहू !’

मद्रास उच्च न्यायालयाच्या टिप्पणीविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, आम्ही अनेक वर्षांपासून सनातन धर्माविषयी बोलत आहोत. सनातन धर्म हे अनेक वर्षांपासूनचे सूत्र आहे. आम्ही नेहमीच त्यास विरोध करू.

मी काहीच चुकीचे बोललो नाही ! – स्टॅलिन

मी काहीच चुकीचे बोललो नाही. मी माझ्या वक्तव्यासाठी कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी सिद्ध आहे. कारवाईच्या भीतीने मी माझे वक्तव्य पालटणार नाही. मी माझी विचारसरणी मांडली आहे. आंबेडकर, पेरियार आणि थिरुमावलवन् यांनी जे म्हटले होते, तेच मी म्हटले आहे. त्यापेक्षा अधिक काहीच बोललो नाही, असे विधान सनातन धर्माची डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांशी तुलना करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

सनातनला नष्ट करण्याची भाषा करणारे पॅलेस्टाईन आणि पर्यायाने हमासचे समर्थक ! – हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष)

श्री. अर्जुन संपथ

‘मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. उदयनिधी स्टॅलिन आणि पी.के. शेखर बाबू यांच्यावर कोणतीच कारवाई न करणार्‍या तमिळनाडू पोलिसांचा निषेध. तमिळनाडू सरकार सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा करणार्‍या कार्यक्रमांचे केवळ प्रायोजकत्वच स्वीकारत नाही, तर त्यांस संरक्षणही पुरवते आणि त्यांचे मंत्री यात सहभागीही होतात. यांचे समर्थन करणार्‍या ‘इंडिया’ आघाडीच्या मानसिकतेविषयी भारतभरातील जनतेने आता सतर्क होणे आवश्यक आहे. सनातनला नष्ट करण्याची भाषा करणारे शहरी नक्षलवाद, तसेच पॅलेस्टाईन अन् त्यान्वये हमासचे समर्थन करणारे आहेत, अशी भूमिका ‘हिंदु मक्कल कत्छी’ (हिंदु जनता पक्ष) या तमिळनाडूतील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशीे भ्रमणभाषद्वारे बोलतांना मांडली.

संपादकीय भूमिका

न्यायालयाने केवळ फटकारून सोडून देऊ नये, तर संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचा, तसेच आरोपींना अटक करण्याचाही आदेश द्यावा, असेच जनतेला वाटते !