‘गाझावर अणूबाँब टाका’, असे म्हणणारे इस्रायलचे मंत्री निलंबित !

इस्रायलचे वारसामंत्री अमिचाई एलियाहू व पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलचे वारसामंत्री अमिचाई एलियाहू यांनी ‘या युद्धात गाझा पट्टीवर अणूबाँब टाकणे हा एक पर्याय आहे’, असे विधान केल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी त्यांना मंत्रीमंडळातून अनिश्‍चित काळासाठी निलंबित केले. पंतप्रधान नेतान्याहू म्हणाले की, इलियाहू यांचे वक्तव्य वास्तविकतेवर आधारित नाही. इस्रायल निष्पापांना दुखापत होऊ नये; म्हणून आंतरराष्ट्रीय कायद्याच्या सर्वोच्च मानकांनुसार कार्य करत आहे. आमचा विजय होईपर्यंत आम्ही त्याचे पालन करत राहू.

हमास नष्ट झाल्यावर ‘गाझावर कुणाचे नियंत्रण असणार’, यावरून चर्चा !

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन आणि पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांचा मध्य-पूर्व दौरा चालू आहे. त्यांची आणि पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्यात वेस्ट बँकच्या रामल्ला शहरात बैठक झाली. ‘हमास नष्ट झाल्यास गाझामध्ये कुणाचे नियंत्रण प्रस्थापित करायचे ?’, यावर ब्लिंकन यांना चर्चा करायची आहे, असे मानले जाते. वेस्ट बँक नंतर ब्लिंकन तुर्कीयेला जाणार आहेत. तत्पूर्वी इस्रायलमध्ये पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ब्लिंकन यांनी ४ नोव्हेंबरला जॉर्डनमध्ये सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली होती.