Israeli Embassy Hamas videos : देहलीत इस्रायली दूतावासात भारतीय पत्रकारांना दाखवण्यात आले हमासने केलेल्या क्रौर्याचे व्हिडिओ !

जगातील १५ देशांत दाखवणार व्हिडिओ !

तेल अविव (इस्रायल) – राजधानी देहलीतील इस्रायली दूतावासाने भारतीय पत्रकारांसाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. यात हमासने ७ ऑक्टोबर या दिवशी इस्रायलमध्ये ज्यू लोकांच्या विरोधात केलेल्या क्रौर्याचे व्हिडिओ दाखवण्यात आले. गाझामधील हमासच्या २ सहस्र आतंकवाद्यांनी कशा प्रकारे इस्रायलवर आक्रमण केले, हेही या व्हिडिओजच्या माध्यमातून दाखवण्यात आले.

१. या व्हिडिओजमध्ये सैनिकांच्या शरीरावर लावलेल्या कॅमेर्‍यांचे फूटेज, ‘गो प्रो व्हिडिओ’, सीसीटीव्ही फूटेज, ‘डॅशबोर्ड कॅमेरा’, तसेच हमासचे आतंकवादी आणि पीडित इस्रायली नागरिकांच्या भ्रमणभाषद्वारे बनवण्यात आलेल्या व्हिडिओजचाही समावेश होता.

२. यांतील एका व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हमासच्या एका आंतकवाद्याने मारलेल्या इस्रायली नागरिकांच्या प्रेतांची छायाचित्रे आणि व्हिडिओ त्याच्या कुटुंबियांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवले. व्हिडिओमध्ये तो त्याच्या आईला ‘आई, तुझ्या मुलाने आज अनेक ज्यू लोकांना मारले आहे. तुझा मुलगा ‘हिरो’ आहे’, असे वक्तव्य करतांना दिसत आहे.

३. अन्य एका व्हिडिओत समोरून जाणार्‍या कुत्र्यावर आतंकवादी अनेक गोळ्या झाडतांना दिसत आहेत. रुग्णवाहिकेच्या टायरवर गोळ्या झाडून रुग्णवाहिका निकामी केल्याचेही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले. (इस्रायली सैन्य गाझामधील आतंकवादी लपलेल्या रुग्णालयांवर आक्रमण करत असल्याचा आरोप करणारे काँग्रेसी आता याविषयी काही बोलतील का ? – संपादक)

४. जगभरातील १५ देशांमध्ये अशा प्रकारचे व्हिडिओ दाखवण्यात येणार आहेत, असे इस्रायली अधिकार्‍यांनी सांगितले. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथे याआधीच हे व्हिडिओ दाखवण्यात आले असून २ नोव्हेंबर या दिवशी फ्रान्समध्ये याचे प्रसारण करण्यात येणार आहे.