२५० रुग्‍णांना ४-५ घंटे ताटकळावे लागते

खर्डी (ठाणे) ग्रामीण रुग्‍णालयात एकच आधुनिक वैद्य !

ग्रामीण रुग्‍णालयाचा गलथान कारभार !

खर्डी (ठाणे) – खर्डी ग्रामीण रुग्‍णालयात सध्‍या एकच आधुनिक वैद्य उपलब्‍ध आहे. यामुळे बाह्य रुग्‍ण विभागात तपासणीसाठी येणार्‍या रुग्‍णांची गैरसोय होत आहे. या रुग्‍णालयात प्रतिदिन २५० च्‍या आसपास रुग्‍ण तपासणीसाठी येत असतात; मात्र एकच डॉक्‍टर उपलब्‍ध असल्‍याने रुग्‍णांना ४ – ५ घंटे ताटकळत उभे रहावे लागते. त्‍यामुळे रुग्‍णालयातील रिक्‍त आधुनिक वैद्यांची पदे भरण्‍याची मागणी नागरिकांनी केली आहे. (अशी मागणी नागरिकांना का करावी लागते ? रुग्‍णालय प्रशासनाच्‍या हे लक्षात येत नाही का ? – संपादक)

रुग्‍णालयासाठी २५ कर्मचार्‍यांची पदे संमत केलेली असूनही केवळ १३ कर्मचारी रुग्‍णालयाचा कारभार पहात आहेत. खर्डी ग्रामीण रुग्‍णालयाचे इतरत्र असलेले कर्मचारी, खर्डी ग्रामीण रुग्‍णालयात उपलब्‍ध करून सद्यस्‍थितीत बाह्यरुग्‍ण विभागात दोन शिकाऊ डॉक्‍टर उपलब्‍ध करावेत. यामुळे रुग्‍णांची तपासणी वेळेत होऊन उपचार होतील. – प्रशांत खर्डीकर, ग्रामपंचायत सदस्‍य, खर्डी

खर्डी येथील रोजच्‍या बाह्यरुग्‍ण विभागातील रुग्‍णसंख्‍या लक्षात घेता, शिकाऊ डॉक्‍टरची व्‍यवस्‍था करण्‍यात येईल. तसेच राजीनामा दिलेल्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांच्‍या जागेवर लवकरच कायमस्‍वरूपी अधिकारी नियुक्‍त केला जाईल – कैलास पवार, जिल्‍हा चिकित्‍सक, ठाणे