चार वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचे प्रकरण
नागपूर – येथे चार वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणारा दोषी वसंत दुपारे याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याची फाशीची दया याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेटाळल्यानंतर त्याने फाशी रहित करण्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे.
१. ३ एप्रिल २००८ या दिवशी वसंतने चार वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. नंतर दगडांनी ठेचून तिची हत्या केली होती. नागपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने २३ फेब्रुवारी २०१२ या दिवशी त्याला फाशीची शिक्षा सुनावली.
२. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठानेही २६ नोव्हेंबर २०१४ या दिवशी तीच शिक्षा कायम ठेवली; मात्र त्याने शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयानेही ती शिक्षा कायम ठेवली.
३. त्याने शिक्षेचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केली. ‘अशा विकृत घटनांना आवर घालण्यासाठी आणि गुन्हेगारांना जरब बसावी म्हणून फाशीची शिक्षाच योग्य ठरेल’, असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २०१७ मध्ये याचिका फेटाळली.
४. १० एप्रिल २०२३ मध्ये राष्ट्रपतींनी त्याने केलेली माफीची याचिका फेटाळली. त्यानंतर आता त्याने सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका प्रविष्ट केली आहे.
संपादकीय भूमिकाबलात्कार प्रकरणातील आरोपींना जरब बसण्यासाठी फाशीच्या शिक्षेची कार्यवाही लवकर व्हावी, ही अपेक्षा ! |