सांगली येथे सर्वपक्षीय बैठकीत संमत करण्यात आलेल्या प्रस्तावाची होळी !
छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वपक्षीय बैठकीत संमत करण्यात आलेल्या प्रस्तावाची सांगली येथे १ नोव्हेंबर या दिवशी होळी करून सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कवठा गावातील शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ३ नोव्हेंबर या दिवशी जिवंत समाधी घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
विनायकराव पाटील म्हणाले की, सरकार आरक्षणात फूट पाडण्याचे काम करत आहेत. मी सर्व देवतांच्या समोर भजन कीर्तन करत ३ नोव्हेंबर या दिवशी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व गावांत आंदोलन झाले. तो (मनोज जरांगे) ही निष्पाप आहे. यासाठी त्याचे नेतृत्व पत्करले पाहिजे. मी त्यांना कळवले की, तुम्ही जगा. युद्ध जिंकायचे असेल, तर कॅप्टन जगला पाहिजे, त्यासाठी आम्ही जरांगे यांना कॅप्टन मानले आहे.
नाशिक – मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर मराठा समाज बांधव यंदाची दिवाळी साजरी करणार नाही, असा निर्णय येथील छत्रपती शिवाजी स्मारक येथे १ नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
इतर घडामोडी
मराठवाड्याच्या अनेक भागांत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. बीड, धाराशिव यानंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी जनार्धन विधाते यांनी याविषयीचे आदेश ३१ ऑक्टोबरच्या रात्री काढले आहेत. जिल्ह्यात जाती-जातीत तणाव आणि मराठा-धनगर समाजाचे आंदोलन यांमुळे निर्माण होणार्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.