सातारा जिल्‍ह्यातील वाई आणि खंडाळा तालुके दुष्‍काळग्रस्‍त घोषित !

प्रतिकात्मक चित्र

सातारा, १ नोव्‍हेंबर (वार्ता.) – राज्‍यात अल्‍प पावसामुळे काही जिल्‍ह्यांमध्‍ये दुष्‍काळग्रस्‍त परिस्‍थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामासाठी पहिल्‍या टप्‍प्‍यात ४० तालुक्‍यांमध्‍ये दुष्‍काळ घोषित करण्‍यास राज्‍य मंत्रीमंडळाकडून मान्‍यता देण्‍यात आली आहे. त्‍यानुसार सातारा जिल्‍ह्यातील वाई आणि खंडाळा या २ तालुक्‍यांचा मध्‍यम स्‍वरूपाचा दुष्‍काळ असणारे तालुके म्‍हणून समावेश करण्‍यात आला आहे.

संपूर्ण महाराष्‍ट्रामध्‍ये धरणांचा जिल्‍हा म्‍हणून सातारा जिल्‍ह्याची ओळख आहे. यंदा पाऊस अत्‍यल्‍प असल्‍यामुळे सर्वत्र दुष्‍काळग्रस्‍त परिस्‍थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम येत्‍या खरीप हंगामावर होणार आहे. राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीमध्‍ये पहिल्‍या टप्‍प्‍यात राज्‍यातील ४० तालुक्‍यांमध्‍ये दुष्‍काळ जाहीर करण्‍यात आला आहे. यामध्‍ये आवश्‍यक ते निकष निश्‍चित करून दुष्‍काळसदृश्‍य परिस्‍थिती जाहीर करण्‍यात येईल.

सातारा जिल्‍ह्यातील माण आणि खटाव हे नेहमीच दुष्‍काळग्रस्‍त तालुके म्‍हणून ओळखले जातात; पण तरीही राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीमध्‍ये पहिल्‍या टप्‍प्‍यात माण आणि खटाव या तालुक्‍यांचा समावेश करण्‍यात आलेला नाही.