मराठा आरक्षण आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने प्रशासनाचा निर्णय
बीड – येथे प्रत्येक तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटर अंतरापर्यंत, तसेच जिल्ह्यातील प्रमुख मुख्य महामार्ग येथे संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी करण्यात येणार्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून ३० ऑक्टोबर या दिवशी दिवसभर अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. यात सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेची मोठी हानी झाली. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
आंदोलकांकडून अनेक महामार्गांवर ‘रास्ता रोको’ !
बीड जिल्ह्यामध्ये परळी-बीड, धुळे-सोलापूर आणि कल्याण-विशाखापट्टणम् या महामार्गांवरही आंदोलन करत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कल्याण- विशाखापट्टणम् महामार्गावर तालखेड फाटा येथे मराठा समाज आंदोलन करत असून रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.