इस्लामाबाद (पाकिस्तान) – दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्या पाकिस्तानचे रेल्वे कर्मचारी २ नोव्हेंबरपासून संपावर जाण्याची शक्यता आहे. सप्टेंबर मासापासून त्यांना वेतन मिळालेले नाही. २ नोव्हेंबर या दिवशी वेतन देण्याचे अधिकार्यांनी म्हटले आहे. ‘जर या दिवशी वेतन मिळाले नाही, तर आम्ही संप करू’, असे कर्मचार्यांनी घोषित केले आहे. पाकिस्तानमध्ये सर्वाधिक कर्मचारी असणारा रेल्वे हा दुसरा विभाग आहे.
रेल्वे कर्मचार्यांनी काही दिवसांपूर्वीच आंदोलन केले होते. त्यामुळे देशातील रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. ‘पाकिस्तान रेल्वे ट्रेन ड्राइव्हर्स असोसिएशन’च्या एका पदाधिकार्याने म्हटले की, वरिष्ठ अधिकार्यांनी सप्टेंबरचे वेतन २ नोव्हेंबर या दिवशी देण्याचे आश्वासन दिले आहे. पाहूया की, ते असे करतात का ? जर त्यांनी २ नोव्हेंबरला वेतन दिले नाही, तर संप करण्यास प्रारंभ करू.
रेल्वेला हवे आहेत साडेतीन सहस्र कोटी रुपये !
पाकिस्तान रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाहिद अझीज यांनी सांगितले की, आमचा विभाग आर्थिक संकटातून जात आहे. रेल्वेला साडेतीन सहस्र कोटी रुपयांची आवश्यकता आहे. आम्ही तशी मागणी केली आहे. केवळ कर्मचार्यांच्या वेतनासाठीच ५०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या व्यतिरिक्त रेल्वे रुळ आणि अन्य कामांसाठी ८०० ते ९०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. याखेरीज कर्ज फेडण्यासाठीही पैशाची आवश्यकता आहे.
पाकचे विमान वाहतूक आस्थापनही डबघाईला !
पाकच्या रेल्वे सेवेच्या पूर्वीच पाकिस्तानी विमान वाहतूक डबघाईला आलेली आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाईन्सच्या महसुलामध्ये ७० टक्के घट झाली आहे. या आस्थपनाची ६०० विमान उड्डाणे रहित करण्यात आली आहेत. इंधनासाठीही आस्थापनाकडे पैसे नाहीत.