Gautam Adani Cases In US : उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरुद्धच्या सर्व प्रकरणांची सुनावणी एकाच न्यायालयात होणार !

न्यूयॉर्क न्यायालयाचा आदेश !

उद्योगपती गौतम अदानी

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध अमेरिकेत चालू असलेल्या लाचखोरीच्या न्यायालयीन प्रकरणांत एक महत्त्वपूर्ण निर्णय न्यूयॉर्कच्या न्यायालयाने घेतला आहे. न्यायालयाने म्हटले की, अदानी यांच्या विरुद्ध चालू असलेले तीनही दिवाणी आणि फौजदारी खटले एकाच वेळी सुनावणीसाठी घेतली जावीत. तसेच तिन्ही प्रकरणांची एकत्रित सुनावणी एकाच न्यायालयात करावी. तिन्ही प्रकरणे समान आरोप आणि व्यवहार यांच्याशी संबंधित असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने न्यायालयाने हा निर्णय देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

कोणत्याही प्रकारचा संघर्ष टाळता यावा, म्हणून ही प्रकरणे एकाच न्यायाधिशासमोर ठेवण्यात आली आहेत.

काय आहे प्रकरण ?

अलीकडेच गौतम अदानी आणि त्यांचे काही साथीदार यांच्यावर अमेरिकेत आरोप झाले होते की, त्यांनी सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी अनुमाने २ सहस्र ३०० कोटी रुपयांची लाच दिली होती. ज्या गुंतवणूकदारांकडून आणि अमेरिकी बँकांकडून या प्रकल्पासाठी पैसा उभा करण्यात आला होता, त्यांच्यापासून ही वस्तूस्थिती लपवण्यात आल्याचा आरोपही काही अमेरिकी अधिवक्त्यांनी केला होता. अदानी समूहाच्या वतीने हे सर्व आरोप निराधार असल्याचे सातत्याने सांगण्यात येत आहे.