वाहनांची जाळपोळ !
बीड – जिल्ह्यातील माजलगाव येथेे मराठा आरक्षण आंदोलनाला ३० ऑक्टोबर या दिवशी हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली, तसेच त्यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या १२ वाहनांची जाळपोळ केली. या प्रकारामुळे बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण चालू केले होते, तेव्हा हे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने जरांगे यांच्याकडे १ मासाची समयमर्यादा मागितली. तेव्हा मनोज जरांगे यांनी सरकारला ‘मी ४० दिवस आंदोलन करणार नाही’, असे आश्वासन दिले होते. याविषयीच्या ध्वनीमुद्रित संभाषणात आमदार प्रकाश सोळंके हे या समयमर्यादेवरून मनोज जरांगे यांना कथितरित्या हिणवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर संतप्त झालेल्या जमावाने सोळंके यांच्या घरावर आक्रमण केल्याचे सांगितले जात आहे.
याविषयी आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की, ही घटना दुर्दैवी आहे. माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे. तरीही राजकीय खोडसाळपणातून हा प्रकार झाला आहे. राजकीय द्वेष पसरवून त्याचा अपलाभ घेण्याचा हा प्रकार आहे. मराठा समाजात अपसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.