रिवण पंचायतीचा प्रस्तावित ‘आयआयटी’ प्रकल्पाला पाठिंबा
सांगे – तालुक्यातील रिवण पंचायतीने २९ ऑक्टोबरला झालेल्या ग्रामसभेत सांगे येथील प्रस्तावित ‘आयआयटी’ प्रकल्पाला संमती देणारा ठराव एकमताने संमत केला. रिवण गावाच्या पूर्वीच्या नावावरून प्रस्तावित प्रकल्पाला ‘ऋषीवन’, असे नाव द्यावे, अशी सूचना करणारा ठरावही ग्रामसभेत संमत करण्यात आला. ग्रामसभेला स्थानिक आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई उपस्थित होते.
नवीन बोरी पुलाच्या भूसंपादन प्रक्रियेला लोटली ग्रामस्थांचा विरोध
पणजी – लोटली पंचायतीच्या २९ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या विशेष ग्रामसभेत बोरी-लोटली या नवीन पुलाच्या भूसंपादन प्रक्रियेला विरोध दर्शवण्यात आला. ग्रामस्थांच्या मते नवीन प्रस्तावित पुलामुळे गावातील शेत आणि खाजन भूमी नष्ट होणार आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभेनंतर नवीन पुलामुळे खाजन आणि शेतभूमी कशा प्रकारे नष्ट होईल, याविषयी जागृती मोहिमेला आरंभ केला आहे.
सावईवेरे ग्रामसभेत शितोळे प्रकल्प रहित करण्याचा निर्णय
फोंडा – सावईवेरे पंचायतीच्या २९ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या विशेष ग्रामसभेत शितोळे प्रकल्प रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे लोकांना विश्वासात घेऊन प्रकल्पाला संमती देण्याचे ग्रामसभेत ठराव घेण्यात आला. सावईवेरे येथे भूतखांब पठारानजीक पुरातन शितोळे तळे आहे. सरकार या तळ्याचे सुशोभीकरणाचे काम करत आहे. सरकारच्या या प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. या सूत्रावरून सावईवेरे पंचायतीची २९ ऑक्टोबर या दिवशी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर प्रकल्प रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामसभेत शितोळे प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आलेल्या जलस्रोत खात्याच्या अधिकार्यांना ग्रामस्थांनी परत पाठवले. ग्रामसभेतून अधिकार्यांनी काढता पाय घेतला.
पेडणे मतदारसंघ राखीव नको ! – धारगळ पंचायतीच्या ग्रामसभेत मागणी
पेडणे – धारगळ पंचायतीच्या २९ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या ग्रामसभेत गेली ४५ वर्षे पेडणे मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. पुढील विधानसभा निवडणुकीत ही राखीवता काढून टाकण्याची मागणी करण्यात आली.
कारापूर-सर्वण पंचायतीच्या ग्रामसभेला अल्प प्रतिसाद
२९ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या कारापूर-सर्वण पंचायतीच्या ग्रामसभेला ५ पंचसदस्य अनुपस्थित होते. ग्रामसभेला ग्रामस्थांचीही अत्यंत अल्प उपस्थिती होती. सुमारे १ घंटा चाललेल्या या ग्रामसभेत कचरा, मोकाट गुरे, भटकी कुत्रे आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.