संपूर्ण जिल्ह्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणार ! – समीर शेख, जिल्हा पोलीस अधीक्षक   

सातारा, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – संपूर्ण सातारा जिल्ह्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा राबवण्यात येणार आहे. याचा प्रारंभ लोणंद पोलीस ठाण्यापासून झाला आहे. या यंत्रणेच्या वतीने ग्रामस्थांना, तसेच अडचणीत असणार्‍या नागरिकांना गुन्हेगारी रोखण्यासोबत पोलिसांचे साहाय्य मिळणार आहे. ही योजना जिल्ह्यामध्ये यशस्वी होईल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी व्यक्त केला. सातारा जिल्हा परिषद आणि सातारा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसुरक्षा यंत्रणा योजना जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे. याविषयीचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे पार पडले. या वेळी समीर शेख बोलत होते. ते म्हणाले की, गावामध्ये एखादी दुर्घटना घडली, तर एकाच वेळी शेकडो ग्रामस्थांच्या भ्रमणभाषवर माहिती मिळून तात्काळ संबंधितांना साहाय्य मिळणार आहे.

संकटकाळामध्ये आपत्तीग्रस्त नागरिकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या ‘टोल फ्री’ क्रमांक १८०० २७०३६००, तसेच ९८२२११२२८१ या क्रमांकावर दूरभाष करावा. या वेळी संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना दूरभाष स्वरूपात तात्काळ ऐकवला जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही दुर्घटनेला आळा घालणे शक्य होणार आहे.