मडगाव, २६ ऑक्टोबर (वार्ता.) : मायणा-कुडतरी येथून २४ ऑक्टोबर २०२३ या दिवशी बेपत्ता झालेल्या ४ मुलींना पोलिसांनी शोधून काढले आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार २४ ऑक्टोबर या दिवशी या ४ मुली मायणा-कुडतरी भागातून बेपत्ता झाल्या होत्या. त्यासंबंधी पालकांनी मायणा-कुडतरी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी अन्वेषणाला प्रारंभ करून बेपत्ता झालेल्या या मुलींना शोधून काढले. या ४ मुलींपैकी ३ मुली अल्पवयीन आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ५ संशयितांना अटक केली असून त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७३ आणि गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. देमेतियस फर्नांडिस (वय १८ वर्षे), काइमिक्स कुतिन्हो (वय १९ वर्षे), मोविन कुतिन्हो (वय १८ वर्षे), नोवेल फर्नांडिस (वय १९ वर्षे) आणि अझिम अहमद (वय २१ वर्षे), अशी या संशयितांची नावे आहेत. या ४ मुलींचे अपहरण करून संशयितांनी त्यांना डोंगरावरील निर्जन स्थळी नेले होते. या मुलींना कह्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असून त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.