गोवा : संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे स्थानांतर

पेडणे येथे श्री सरस्वती पूजनाला अनुमती नाकारल्याचे प्रकरण

संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फिलीप रॉड्रिग्स इमेलो

पणजी, २५ ऑक्टोबर (वार्ता.) : पेडणे येथील येथील संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फिलीप रॉड्रिग्स इमेलो यांचे स्थानांतर करण्यात आले आहे. शिक्षण खात्याने २५ ऑक्टोबर या दिवशी यासंबंधी आदेश काढला आहे. महाविद्यालय परिसरात श्री सरस्वती पूजन करण्यास अनुमती नाकारण्यात आल्यानंतर हे स्थानांतर झालेले आहे. डॉ. फिलीप रॉड्रिग्स इमेलो यांच्याकडे महाविद्यालयाचा तात्पुरता पदभार देण्यात आला होता. आता त्यांना म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयात पुन्हा पाठवण्यात आले आहे. शिक्षण खात्याने संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी हंगामी तत्त्वावर प्रा. प्रवीणा केरकर यांची नियुक्ती केली आहे.

काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी श्री सरस्वती पूजनास अनुमती नाकारल्याने महाविद्यालयाच्या बाहेर आंदोलन केले होते. महाविद्यालय व्यवस्थापन गेली २ वर्षे महाविद्यालय परिसरात श्री सरस्वती पूजन करण्यास अनुमती नाकारत आहे. अनुदानित महाविद्यालय असल्याने ही अनुमती नाकारली जात असल्याचे समजते. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय व्यवस्थापनाने अनुमती नाकारूनही विद्यार्थ्यांच्या वतीने मागील दोन्ही वर्षे महाविद्यालयाच्या आवारात श्री सरस्वती पूजन करण्यात आले होते.