मानवांनो, ममत्वाच्या कारावासातून मुक्तता करून घेण्यासाठी प्रयत्नशील व्हा !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

१. माया हा कारावास आहे, हे प्रथम जाणा !

‘आम्ही फार फार प्राचीन आहोत. आमचे अनंत जन्म झाले आहेत. आम्ही अनेक जन्म ज्ञानवचने ऐकत आलो आहोत. आम्ही अनेक जन्म ममत्वाच्या गर्तेत फिरलो आहोत आणि तरीही आम्ही तसेच कोरडे आहोत. अजूनही निजलोच आहोत. अजूनही आमचे डोळे उघडत नाहीत. अनेक वेळा पहाट झाली आहे. अनेक वेळा सूर्य उगवला आहे; पण आम्ही मात्र अंधारात आहोत. अंधाराला (ममत्वाच्या अंधाराला) पकडून आहोत. हे दुर्भाग्य कसे टळेल ? या ममत्वाच्या कारावासातून कशी मुक्तता होईल ? आधी ‘हा कारावास आहे’, हे कळले की, तेथून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करता येईल. ‘हा तुरुंग नाही, राजमहाल आहे’, असे ज्यांना वाटते, ते कशाला त्यातून बाहेर पडतील ?’

२. भगवतीच्या कृपाप्रसादाने अज्ञानातून मुक्तता होणे आणि सगळीकडे तिचीच चेतना दिसून येते !

भगवतीच्या कृपेनेच ममत्वाच्या या कारावासाची जाणीव होते आणि तिच्या कृपाप्रसादाने त्यातून मुक्तता होते, विवेक, बोध जागतो आणि ‘मी’ विरतो. सगळे विश्व विरून जाते. उरते ती भगवती, केवळ आदिशक्ति. ‘या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते।’ (देवीसूक्त, श्लोक ७), म्हणजे ‘जी देवी प्राणीमात्रांमध्ये चेतना म्हणून ओळखली जाते’, ती विश्वातील चेतना भगवती दिसते. ‘चेतना आहे म्हणून विश्व आहे’, ही जाण होते. कोकिळेचा कंठ त्या भगवतीचाच कंठ आहे, आकाशाची नीलिमा त्या आदिशक्तीचीच आहे. फुलांचा रंग तिचाच, सुगंधही तिचाच, वायूची गती तीच आहे आणि मेघांचा गडगडाट, मोराचे नृत्य, सागराच्या लाटांची क्रिडा सगळे तीच चेतना ! तीच भगवती !’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑगस्ट २०२३)