सातारा, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – निवडणुकीच्या काळात महसूल आणि पोलीस विभागाने समन्वयाने काम करावे, तसेच या दोन्ही विभाग यांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४’ची पूर्वसिद्धता आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘‘जिल्ह्यात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. त्यामुळे कोणत्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडणार नाही. मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. सर्व मतदान केंद्रांची वस्तूनिष्ठ माहिती घेऊन महसूल आणि पोलीस विभागाने त्यांचे सर्वेेक्षण करावे. मतदान केंद्रांवर काही त्रुटी असल्यास सोयी-सुविधांचा अभाव याविषयी माहिती घ्यावी. त्यानुसार अहवाल सिद्ध करून २५ ऑक्टोंबरपर्यंत द्यावा. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान केंद्राची रचना असेल, असे पहावे. इंटरनेट, फोन कनेक्टीव्हिटीच्या दृष्टीने शॅडो झोनविषयीची माहिती घेण्यात यावी. मतदारसूची अद्ययावत करण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. तृतीय पंथी, अपंग यांच्या नोंदणीसाठी प्रत्यक्ष भेटीतून त्यांचे अर्ज भरून घ्यावे. या कामास प्राधान्य द्यावे. मतदान केंद्रांवर अपंगांसाठी सर्व सोयी उपलब्ध करून द्याव्यात. मृत व्यक्तींची नावे मतदारसूचीतून वगळण्याची प्रक्रिया गतीने करावी. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
जिल्हाधिकारी म्हणाले की, १८ ते १९ वर्षे वयोगटातील पात्र मतदारांच्या नोंदणीसाठी प्रयत्न करावेत. सध्या जिल्ह्यात या वयोगटातील २६ सहस्र मतदारांची नोंद आहे, तर जिल्ह्यात या वयोगटातील १ लाख १७ सहस्रच्या जवळपास मतदार आहेत. त्यांची नोंदणी प्राधान्याने करावी. (हे जिल्हाधिकार्यांना का सांगावे लागते ? – संपादक) गत निवडणुकीत ज्या ठिकाणी मतदान अल्प झाले, त्या ठिकाणी जनजागृतीसाठी उपक्रम आणि विशेष मोहिमा राबवाव्यात. स्वीप कार्यक्रम राबवावा. अवैध मद्य प्रकरणांमध्ये कडक कारवाई करावी. ही कारवाई चालू करून निवडणूककाळात याविषयी जागरूक राहून अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी.