निवडणुकीवर बहिष्कार !
छत्रपती संभाजीनगर – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी (जिल्हा जालना) येथे नुकतीच विराट सभा झाली. तरीही सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्वच राजकीय पक्षाच्या पुढार्यांना गावात प्रवेशबंदी आणि आगामी होणार्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.
या वेळी गावकर्यांनी राजकीय पक्षाच्या पुढार्यांना गावबंदी असल्याविषयीचे फलक हातात घेऊन गावात फिरून सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या, तसेच हे फलक वांगी बुद्रुक फाट्यावर लावण्यात आले आहेत. या वेळी गावातील सर्व जातीधर्माच्या लोकांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आपला सहभाग नोंदवला.