मुंबई, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – महाराष्ट्रातील ५११ ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास केंद्रे चालू करण्यात येणार आहेत. या केंद्रांमध्ये शिवणकाम, वेष्टन करणे यांसह इलेक्ट्रिकल्स कोर्स, पंप दुरुस्ती, बांधकाम आदी विविध रोजगार प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे. विद्यार्थी, युवक, महिला आदींना त्यांच्या वेळेनुसार या केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेता येणार आहे, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी १७ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
मंगल प्रभात लोढा म्हणाले, ‘‘१९ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्रात एकूण २८ सहस्र ग्रामपंचायती आहेत; मात्र एकाही ग्रामपंचायतीमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र नाही. रोजगारामुळे युवकांचे गावातून शहराकडे स्थलांतर होऊ नये, यासाठी ही कौशल्य विकास केंद्रे चालू करण्यात येत आहेत. मुंबई वगळता राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार आहेत. भविष्यात या केंद्राची संख्या वाढवण्यात येईल. यामध्ये इंटरनेटची सुविधाही देण्यात येईल. १८ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तीला यामध्ये प्रशिक्षण घेता येणार आहे.’’