आत्महत्येचा प्रयत्न आणि आंदोलने यांच्या वाढत्या घटनांमुळे मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ !

मुंबई, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – आत्महत्येचे प्रयत्न आणि आंदोलने यांच्या पार्श्‍वभूमीवर मंत्रालयाच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मंत्रालयाचा परिसर, तसेच मंत्रालयातील प्रत्येक मजला यांवर गणवेशासह सामान्य पोषाखामध्ये पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे.

१. मागील आठवड्यात संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयातील पहिल्या मजल्यावर पत्रके भिरकवून आंदोलन केले. त्याच्या काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने वरील मजल्यावरून उडी मारली; पण जाळीत अडकल्यामुळे ती वाचली.

२. मंत्रालयात यापूर्वी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. या घटनांची वारंवारता लक्षात घेता मंत्रालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारने स्वतंत्र शासन आदेश काढला आहे.

३. या शासन आदेशावर येत्या मासाभरात कार्यवाही करण्याचा आदेश देण्यात आला आहे; मात्र कार्यवाही होण्यापूर्वीच सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

४. मंत्रालयाच्या मुख्य द्वारातून यापूर्वी सर्व चारचाकी गाड्यांना प्रवेश देण्यात येत होता; मात्र मागील आठवड्यापासून मुख्य द्वारातून केवळ मंत्र्यांच्या गाड्यांना प्रवेश देण्यात येत आहे. आमदार, तसेच अन्य यांच्या गाड्यांना मंत्रालयाच्या ‘गार्डन गेट’मधून प्रवेश देण्यात येत आहे. यासह येत्या काही दिवसांत मंत्रालयात बाहेरून पदार्थ आणण्यावर बंदी घालणे, वाहन पार्किंगसाठी ‘कलर कोड’ पद्धतीचा अवलंब करणे, अभ्यागतांना ‘ऑनलाईन’ प्रवेशपत्र देणे, मंत्रालयात पाळीव प्राण्यांना प्रतिबंध करणे आदी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.