३०० हून अधिक सैनिकांचा मृत्यू !
तेल अविव (इस्रायल) – इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धात आतापर्यंत इस्रायलचे ३०० हून अधिक सैनिक ठार झाले आहेत. यांमध्ये भारतीय वंशाच्या २ भारतीय महिला सैनिकांनाही वीरमरण आले आहे. ७ ऑक्टोबर या दिवशी हमासने केलेल्या हवाई आक्रमणात त्या दोघी ठार झाल्या. सैन्यातील लेफ्टनंट ऑर मोझेस आणि पोलीस दलातील किम डोक्राकर अशी त्यांची नावे आहेत. या युद्धात इस्रायलचे २८६ सैनिक आणि ५१ पोलीस यांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायलमधील भारतियांनी दिलेल्या माहितीनुसार तेथील भारतीय वंशाच्या मृतांची संख्या वाढू शकते. हमासने ओलीस ठेवलेल्यांमध्ये भारतीय वंशाचे लोक असण्याचीही शक्यता आहे. भारतीय वंशाची महिला शहाफ टॉकर ७ ऑक्टोबरला झालेल्या आक्रमणात थोडक्यात बचावली.