कोपरगाव (अहिल्यानगर) – सनातन धर्म नष्ट करण्याविषयीचे द्वेषमूलक वक्तव्य करणार्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील हिंदु समाजाने सजग होण्याची आणि लोकशाही मार्गाने या धर्मविरोधी वक्तव्यांचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. समितीच्या वतीने येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला कोपरगाव बार असोसिएशनचे सदस्य अधिवक्ता राजेंद्र वाघ आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अक्षय महाजन उपस्थित होते.
‘अशा प्रकारे षड्यंत्र करणार्यांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यासह त्यांची ‘एन्.आय.ए.’कडून (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून) चौकशी करण्यात यावी’, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे ‘प्रत्येक हिंदु धर्मरक्षकाने स्थानिक ठिकाणी अशा द्वेषमूलक वक्तव्ये करणार्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करावी’, असे आवाहन कोपरगाव येथील अधिवक्ता राजेंद्र वाघ यांनी या वेळी पत्रकार परिषदेत केले.
‘आम्ही हिंदुत्वनिष्ठ सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्यांच्या विरोधात लढा देण्यासाठी खंबीरपणे उभे राहू’, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अक्षय महाजन यांनी केले.
जिल्ह्यात ४ तालुक्यांत तक्रारी प्रविष्ट करणार ! – प्रदीप देशमुख, हिंदु जनजागृती समिती
सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्यांच्या विरोधात सध्या समविचारी संघटनांच्या वतीने जागृतीपर ‘सनातन धर्मरक्षण अभियान’ राबवण्यात येत आहे. या अंतर्गत धर्मविरोधी शक्तींचा लोकशाही मार्गाने विरोधही केला जाणार आहे. कोपरगावसह नगर जिल्ह्यात नगर शहर, नेवासा, श्रीरामपूर या तालुक्यांत सनातन धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्यांच्या विरोधात तक्रारी प्रविष्ट करण्यात येणार आहेत.