अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ललित पाटील याच्या घरावर धाड !

‘एस्.आय.टी.’कडून चौकशी करा ! – वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

पुणे – ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’मध्ये वैद्यकीय उपचार घेत असतांना ललित पाटील हा अमली पदार्थांची विक्री करत होता. सध्या तो पसार झाला आहे. पोलिसांनी त्याच्यासह ३ आरोपींच्या नाशिक येथील घरांवर धाडी टाकल्या. त्यातून ‘पेन ड्राईव्ह’ (संगणकातील माहिती साठवण्याचे उपकरण) आणि भ्रमणभाष संच जप्त केले. भ्रमणभाषमधील माहितींचे विश्‍लेषण करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुख्य आरोपी ललित पाटील, भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांचा शोध घेण्यात येत आहे. ललितला ‘ससून’मधून पळून जाण्यास साहाय्य करणारा गाडीचालक दत्ता डोके याला पोलिसांनी अटक केली आहे. या आधी ललितचे साथीदार सुभाष मंडल, रौफ शेख यांनाही अटक केली आहे.

पोलिसांनी न्यायालयामध्ये प्रविष्ट केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, ‘ससून’मध्ये असतांना ललितकडून २ भ्रमणभाष जप्त केले होते. त्यातील ‘सांकेतिक’ शब्द (पासवर्ड) देण्यास त्याने नकार दिला होता. त्यामुळे तज्ञांच्या साहाय्याने भ्रमणभाषचे तांत्रिक विश्‍लेषण करण्याचा प्रयत्न चालू आहे; परंतु ‘सांकेतिक’ शब्द मिळाले नाहीत. भ्रमणभाष आस्थापनाशी संपर्क करण्यात आला आहे.

‘ससून’ रुग्णालय हे आरोग्य सेवा देणारे रुग्णालय आहे कि, गुन्हेगारांचा अड्डा ?  असा प्रश्‍न पडला आहे. रुग्णसेवेच्या नावाखाली गंभीर स्वरूपाचे आरोप असलेले गुन्हेगार रुग्णालयात येऊन मजा मारत आपले ‘धंदे’ चालवत आहेत. त्यामुळे सरकारने या प्रकरणाची विशेष अन्वेषण पथकाद्वारे (एस्.आय.टी.) चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.