कारवाईच्या वेळी पोलीस आणि चप्पल स्टँडचालक यांच्यात वाद
कोल्हापूर – येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरातील चप्पल स्टँड अनधिकृत असल्याचे सांगत प्रशासनाकडून ते हटवण्यात आले आहेत. या वेळी चप्पल स्टँड हटवण्यावरून पोलीस आणि चप्पल स्टँडचालक यांच्यात झटापट झाली. चप्पल स्टँड अनधिकृत असल्याचे सांगत प्रशासनाकडून चप्पल स्टँडचालकांना नोटीस देण्यात आली होती. पोलीस स्टँड हटवण्याची कारवाई करत असतांना ‘आम्हाला नोटिशीवर दिलेल्या समयमर्यादेपूर्वीच ही कारवाई केली जात असल्या’चा आरोप स्टँडचालकांनी केला आहे. या वेळी चालकांच्या साहाय्यासाठी मनसेचे पदाधिकारीही आले असल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे, तसेच परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे काम चालू आहे. कोल्हापूर मंदिरात भाविक आल्यानंतर स्वत:च्या चपला चप्पल स्टँडमध्ये ठेवतात. त्यामुळे चप्पल स्टँड धारकांनाही रोजगार मिळत होता. या चप्पल स्टँडवर परिसरातील किमान १० कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.
कारवाई कायदेशीर पद्धतीने – प्रशासनाचा दावा !
मंदिर परिसरातील सर्व चप्पल स्टँड अनधिकृत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळेच अतिक्रमण हटवणार्या पथकाकडून कारवाई केली जात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. ही कारवाई कायदेशीर पद्धतीने केली गेल्याचा दावा प्रशासनाने केला आहे, तर ‘आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही न्यायालयात गेलो आहोत; मात्र समयमर्यादेपूर्वीच आमच्यावर कारवाई केली जात आहे’, असा आरोप चप्पल स्टँडचालक करत आहेत.