आज ‘तुळजापूर बंद’चे आवाहन
तुळजापूर (जिल्हा सोलापूर) – श्री तुळजाभवानी मंदिर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडप हा घाटशीळ येथे करण्यास काही पुजारी, व्यापारी आणि स्थानिक नागरिक यांचा विरोध आहे. त्यामुळे ११ ऑक्टोबर या दिवशी तुळजापूर शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. श्री तुळजाभवानीमातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सिद्धता अंतिम टप्प्यात आली आहे. १५ ऑक्टोबर या दिवशी घटस्थापना होणार आहे.
१. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त आणि भाजपचे आमदार जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मंदिर परिसर विकास आराखडा’ सिद्ध करण्यात आला आहे.
२. आराखड्याचे १५ ऑक्टोबर या दिवशी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासकीय कार्यालयासमोर सादरीकरण होणार आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत यावर भाविक, पुजारी, व्यापारी आणि स्थानिक नागरिक यांना सूचना करता येणार आहेत. १६ आणि १७ ऑक्टोबर या दिवशी सूचनांवर समक्ष चर्चा होणार आहे, तर २० ऑक्टोबरपर्यंत नागरिक आणि भाविक यांनी केलेल्या सूचनांवर तांत्रिक अन् प्रशासकीय विभागाकडून अभिप्राय घेतला जाईल. २६ ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकार्यांना याविषयीचा अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे.
नवीन आराखड्यातील सभामंडपाच्या विरोधाची कारणे !
घाटशीळ येथे सभामंडप उभारल्याने मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून भाविकांना प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे देवीच्या दर्शनापूर्वी श्री गणेशाचे दर्शन, तसेच गोमुख कुंडामध्ये स्नान करणे किंवा पाय धुणे अशा धर्मशास्त्रीय कृती न होता थेट मंदिराच्या गाभार्यात प्रवेश मिळणार आहे. मंदिरात होणारा हा प्रवेश धर्मशास्त्राला धरून नाही, तसेच मुख्य प्रवेशद्वारातून भाविक मंदिरात प्रवेश करणार नसल्याने व्यापार्यांच्या व्यापारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिकांकडून या दर्शन मंडपास स्थानिकांचा विरोध आहे.