पुणे येथे रेल्‍वेचा भीषण अपघात घडवण्‍याचा प्रयत्न फसला !

रेल्‍वे रुळांवर दगड रचण्‍याचा केलेला प्रयत्न म्‍हणजे कायदा-सुव्‍यवस्‍थेचा धाक नसल्‍याचेच उदाहरण !

पुणे – आकुर्डी ते चिंचवडच्‍या दरम्‍यान असलेल्‍या ‘रेल्‍वे ट्रॅक’वर ६ ऑक्‍टोबर या दिवशी दगड रचले होते. यातून भीषण अपघात करण्‍याचा प्रयत्न होता; मात्र रेल्‍वे गार्डसह माहीतगार्‍यांनी दिलेल्‍या माहितीमुळे त्‍यांचा हा डाव फसला आहे. यासंदर्भात माहिती मिळताच रेल्‍वेची सुरक्षायंत्रणा घटनास्‍थळी आली. या घटनेमागे कुणाचा हात होता ? असा अपघात घडवण्‍यामागे कोण आहे ? याची माहिती ‘रेल्‍वे इंटेलिजन्‍स यंत्रणे’कडून घेतली जात आहे, तसेच रेल्‍वे पोलीस दलाकडूनही (आर्.पी.एफ्.) या संदर्भात अन्‍वेषण चालू आहे.

रेल्‍वे प्रवासी ग्रुपच्‍या अध्‍यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले की, या मार्गावरून पुणे-मुंबई दरम्‍यान अनेक रेल्‍वे गाड्या धावतात. कदाचित् एखाद्या गाडीचा अपघात झाला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. सहस्रो प्रवाशांचा जीव धोक्‍यात होता. दोषींना शोधून प्रशासनाने कडक कारवाई करावी.