जनहित याचिका प्रविष्ट करण्याचा निर्णय !
पुणे – श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत यंदा सलग दुसर्या वर्षी ध्वनीपातळीने शंभरी पार केली. पोलिसांनी निर्बंध घालूनही मिरवणुकीत त्याचे पालन झाले नाही. वाढलेल्या ध्वनीपातळीचा त्रास झाल्यामुळे पुणेकरांकडून समाजमाध्यमांत तीव्र खेद व्यक्त केला जात असतांनाच आता राजकीय पक्षांनी भूमिका घेत निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. डीजेचा आवाज आणि आरोग्यावर घातक परिणाम करणार्या ‘लेझर बीम’च्या (विद्युत् चुंबकीय उत्सर्जनामुळे निर्माण झालेला प्रकाश) विरोधात आता सर्वपक्षीय राजकीय लढा चालू झाला आहे. महापालिकेच्या माजी पदाधिकार्यांनी डीजे आणि लेझरच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १० ऑक्टोबरपर्यंत जनहित याचिका प्रविष्ट करण्यात येणार आहे.
संस्कृतीचे पालन करतांना सामाजिक भान हवेच, अशी भूमिका घेत माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी सभागृहनेते उज्ज्वल केसकर, सतीश देसाई, अधिवक्ता श्रीकांत शिरोळे यांच्या माध्यमातून जनहित याचिका प्रविष्ट करण्यात येणार आहे.
अंकुश काकडे यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात डीजे आणि लेझर बीमच्या विरोधात याचिका प्रविष्ट करण्यात येणार असून त्यानंतर ढोल-ताशा पथकांच्या संदर्भात याचिका प्रविष्ट करण्यात येईल. ‘डीजे आणि लेझर यांच्या वापराविषयी निर्बंध हवेत’, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.