‘देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् ।’ (तैत्तिरीयोपनिषद़्, शिक्षाध्याय, अनुवाक ११, वाक्य २)
अर्थ : देव आणि पितर यांच्या कार्यात खंड पडू देऊ नये.
पूर्वीच्या प्रथेनुसार हे वचन गुरूंनी शिष्यांचे विद्यार्जन पूर्ण झाल्यावर ते आश्रमातून घरी गेल्यावर आणि गृहस्थाश्रम स्वीकारल्यावर पुढच्या आयुष्यात ‘आपण काय करावे ? आणि कसे वागावे ?’, हे सांगतांना सांगितले आहे. सध्या तरी समाजात देवकार्याविषयी श्रद्धा वाढीस लागलेली दिसत आहे; परंतु पितरांविषयी म्हणावे, तेवढे कुणी काही करतांना दिसत नाही.
१. श्रौत कर्मकांडात पितरांना देवापेक्षाही अधिक मान देणे
वेदकाळापासून आर्यांनी पितरांना देवाप्रमाणे मानले आहे. हे ऋग्वेदातील पितृसूक्ते आणि पैतृक मंत्राने समजून येते. काही ठिकाणी त्यांना देवापेक्षा श्रेष्ठ दर्जा दिलेला आढळतो. श्रौत कर्मकांडात अग्न्याधान्याच्या (म्हणजे अग्नीची विधीपूर्वक स्थापना करण्याच्या) निमित्त करावा लागणारा गोपितृयज्ञ (म्हणजे गाय आणि पितर यांना प्रसन्न करण्यासाठी करायचा विधी किंवा हवन), चातुर्मासात साकमेध पर्वात (म्हणजे ज्या पर्वात हविर्भाग प्राप्त करून देवतांना समान शक्ती प्राप्त होते.) केला जाणारा महापितृयज्ञ (म्हणजे पितरांचे पूजन आणि त्यांच्या तृप्तीसाठी हवन इत्यादी करणे) आणि प्रत्येक दर्श अमावास्येला करावा लागणारा पिंडपितृयज्ञ (पिंडाद्वारे पितरांसाठी केलेले श्राद्ध) यामध्ये पितरांचा दर्जा देवापेक्षा वरचा वाटतो.
१ अ. पितर : ही एक देवसदृश योनी असून याचे साधारण दोन भाग आहेत. अ. मृत पितर आणि आ. अमृत पितर
१ अ १. मृत पितर : माणसाचा अंत झाल्यावर तो पितरयोनीत जातो; पण मृतावस्थेनंतर लगेच त्याला ‘पितर’ ही संज्ञा प्राप्त होत नाही, तर त्याच्या वर्षश्राद्धानंतर त्याला पितर ही संज्ञा प्राप्त होते.
१ अ २. अमृत पितर : सृष्टीच्या आरंभापासून पितृलोकात रहातात, ते अमृतपितर, उदाहरणार्थ, अंगिरस आणि भृगु इत्यादी ऋषींची गणना पितरांत होते.
‘पितरांविषयी ऋषींना फारच आदर वाटत असे’, हे पुढील ऋचेवरून समजते.
उदीरतामवर उत् परास उन्मध्यमाः पितरः सोम्यासः ।
असुं य ईयुरवृका ऋतज्ञास्ते नोऽवन्तु पितरो हवेषु ॥
– ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त १५, ऋचा १
अर्थ : ‘पृथ्वीवर असणारे पितर उन्नत स्थानी जावोत. स्वर्गात, म्हणजे जे उच्च स्थानी आहेत, ते तेथून कधीही न ढळोत. जे मध्यम स्थानाचा आश्रय करून आहेत, ते उन्नत पदाला जावोत. जे सोम पिणारे अन् केवळ प्राणरूप, शत्रूशून्य आणि सत्यस्वरूप आहेत, असे पितर आमचे संरक्षण करोत’, अशी आमची इच्छा आहे. (यामध्ये ‘सोम्यासः’ असा शब्दप्रयोग आहे, तो ज्या पितरांनी सोमयाग करून स्वर्ग प्राप्त केला आहे, त्यांच्यासाठी आहे.)
१ आ. पितरांच्या अपेक्षा : महाभारतात पितरांनी गायिलेल्या आकांक्षादर्शक गाथा आहेत. त्यातील अनुच्छेद ८८.१२ चा अर्थ असा आहे, ‘आमच्या कुळात असा कुणी पुरुष होईल का की, जो दक्षिणायनाच्या कृष्ण पक्षात मघा आणि त्रयोदशी या योगावर घृतमिश्रित पायस अर्पण करील’, तर अनुच्छेद ८८.१४ चा अर्थ ‘कुळात पुष्कळ पुत्र उत्पन्न होऊन त्यातील एकतरी गयेला जाईल अन् तेथील अक्षय्यवटाखाली श्राद्ध करून श्राद्धफलाला अक्षय्य बनवील.’
२. श्राद्ध
‘श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम् ।’, म्हणजे ‘श्रद्धायुक्त अंतःकरणाने पितरांना तृप्त करण्यासाठी जे कर्म केले जाते, ते श्राद्ध.’
२ अ. श्राद्धाच्या अनेक व्याख्या आढळतात त्यांतील १-२ पाहू.
१. देशे काले च पात्रे च श्रद्धया विधिना च यत् ।
पितृनुद्दिश्य विप्रेभ्यो दत्तं श्राद्धमुदाहृतम् ॥
अर्थ : देश, काल आणि पात्र यांना अनुलक्षून श्रद्धा अन् विधी यांनी युक्त असे पितरांना उद्देशून ब्राह्मणांना जे अन्नादी दान दिले जाते, त्याला ‘श्राद्ध’ म्हणावे.
२. पराशरांनी श्राद्धाचे लक्षण असे सांगितले आहे.
देशे काले च पात्रे च विधिना हविषा च यत् ।
तिलैर्दर्भैश्च मन्त्रैश्च श्राद्धं स्यात् श्रद्धयान्वितम् ॥
अर्थ : योग्य देश, काल अन् पात्रद्वारा हविष्यादि विधियुक्त, तीळ, यव आणि दर्भयुक्त मंत्राने श्रद्धापूर्वक जे कर्म करतो, ते श्राद्ध.
२ आ. श्राद्धाचे प्रकार : श्राद्धाचे न्यूनतम ३ प्रकार आहेत. काही ठिकाणी ते १२ सुद्धा आढळतात.
२ आ १. ‘नित्यं नैमित्तिकं काम्यं त्रिविधं श्राद्धमुच्यते ।’ – मत्स्यपुराण, अध्याय १६, श्लोक ५
अर्थ : श्राद्धाचे नित्य, नैमित्तिक आणि काम्य असे ३ प्रकार आहेत.
२ आ २. ‘यमस्मृति’मध्ये ५ प्रकार सांगितले आहेत : त्यात वरील ३ प्रकार आहेतच. चौथे वृद्धिश्राद्ध आणि पाचवे पार्वण श्राद्ध
२ आ ३. ‘भविष्यपुराण’मध्ये एकूण १२ प्रकार सांगितले आहेत. त्यात वरील ५ प्रकार आहेतच आणि नवीन ७ प्रकार आहेत.
नित्यं नैमित्तिकं काम्यं वृद्धिश्राद्धं सपिण्डनम् ।
पार्वणं चेति विज्ञेयं गोष्ठ्यां शुद्ध्यर्थमष्टमम् ॥
कर्माङ्गं नवमं प्रोक्तं दैविकं दशमं स्मृतम् ।
यात्रास्वेकादशं प्रोक्तं पुष्ट्यर्थं द्वादशं स्मृतम् ॥
अर्थ : १. नित्य, २. नैमित्तिक, ३. काम्य, ४. वृद्धि, ५. सपिण्ड, ६. पार्वण, ७. गोष्ठी, ८. शुद्धि, ९. कर्मांग, १०. दैविक, ११. यात्रा आणि १२. पुष्टी हे श्राद्धाचे १२ प्रकार आहेत.
१. नित्य : प्रतिदिन केले जाणारे.
२. नैमित्तिक : एकोद्दिष्ट इत्यादी प्रकारची श्राद्धे
३. काम्य : विशिष्ट अभिलाषेसाठी करावयाचे श्राद्ध
४. वृद्धि : वृद्धिकालात म्हणजे नूतन अपत्य जन्मानंतर करावयाचे श्राद्ध
५. सपिण्ड : प्रेत पिंडाचे पितृपिंडात सम्मिलन करण्याचे श्राद्ध
६. पार्वण : अमावास्या किंवा पर्वकाली केले जाणारे श्राद्ध
७. गोष्ठी : गायीच्या गोठ्यात केले जाणारे सामूहिक श्राद्ध
८. शुद्धि : शुद्धी निमित्ताने केले जाणारे श्राद्ध
९. कर्मांग : गर्भाधान वगैरे कार्यात करावे लागणारे श्राद्ध
१०. दैविक : सप्तम्यादि विशिष्ट तिथीला विशिष्ट हविष्याद्वारे केले जाणारे श्राद्ध
११. यात्रा : तीर्थयात्रादि पूर्वी केले जाते, ते श्राद्ध
१२. पुष्टी : शारीरिक किंवा धार्मिक उन्नतीसाठी करावयाचे श्राद्ध
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– विद्याधरशास्त्री करंदीकर (साभार मासिक ‘भाग्यनिर्णय’)