कामावर विलंबाने येणार्‍या अधिकार्‍यांचे पुष्‍पगुच्‍छ देऊन स्‍वागत !

भंडारा जिल्‍हा परिषदेतील अनागोंदी प्रकाराची अध्‍यक्षांकडून नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – भंडारा जिल्‍हा परिषदेचे कर्मचारी आणि अधिकारी कार्यालयात वेळेत येत नाहीत. हे लक्षात घेऊन भंडारा जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष गंगाधर जीभकाटे, सभापती प्रेम वणवे आणि जिल्‍हा परिषदेचे सदस्‍य देवा इलमे यांनी ९ ऑक्‍टोबर या दिवशी सकाळी कामावर विलंबाने येणारे कर्मचारी अन् अधिकारी यांना जिल्‍हा परिषदेच्‍या प्रवेशद्वारावर पुष्‍पगुच्‍छ देऊन त्‍यांचे स्‍वागत केले. विलंबाने येणार्‍यांमध्‍ये परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचाही समावेश होता.

अनेक नागरिक कामासाठी दुरून वेळ आणि पैसे व्‍यय करून येतात; मात्र कर्मचारी अन् अधिकारी वेळेत येत नसल्‍याने खोळंबा होऊन नागरिकांना परत जावे लागते.

७ ऑक्‍टोबर या दिवशी विलंबाने येणारे ११५ अधिकारी आणि कर्मचारी यांच्‍यावर कारवाई केली. ९ ऑक्‍टोबर या दिवशीही पुन्‍हा अशीच कारवाई करण्‍यात आली. यात ५० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी यांच्‍यावर कारवाई करण्‍याचा प्रस्‍ताव वरिष्‍ठांकडे पाठवला.

संपादकीय भूमिका

मुख्‍य अधिकारी आणि कर्मचारी कामावर विलंबाने येतात, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पदच आहे. अशांवर वेतन कपात, बढती रोखणे अशा शिक्षा करून तरीही सुधारणा न दिसल्‍यास त्‍यांना बडतर्फ करावे !