सध्या आशियाई देशांच्या क्रीडास्पर्धा चालू आहेत. विविध प्रकारच्या खेळांमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करून सुवर्ण, रौप्य आणि ब्रांझ पदके मिळवत आहेत. आपल्या खेळाडूंनी मिळवलेल्या पदकांमुळे सर्वच भारतियांना त्यांच्याविषयी अभिमान वाटतो. पारूल चौधरी या भारतीय खेळाडूने अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक मिळवून ५ सहस्र मीटर धावण्याच्या शर्यतीत पहिली महिला सुवर्णपदक विजेती होण्याचा मान मिळवला आहे. यामुळे भारताची मान अजूनच उंचावली आहे. या यशाविषयी तिने सांगितले, ‘‘अखेरचे ५० मीटर अंतर शेष असतांना डोक्यात राज्य सरकारकडून मिळणार्या नोकरीविषयी विचार चालू होते !’’ (एशियाड पदक जिंकणार्या खेळाडूस राज्य सरकारकडून पोलीस उपअधीक्षक पदाची नोकरी मिळते.)
हे वाचून आश्चर्य वाटले की, खेळून ‘नोकरी मिळवणे’, हे एवढ्या वरच्या स्तरावरील खेळाडूचे ध्येय कसे असू शकते ? त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की, खेळाडू खरेच आपल्या देशासाठी खेळतात कि पैसे कमवण्याच्या हेतूने खेळतात ? खरे तर खेळाडूला आंतरराष्ट्रीय पदक मिळणे, हा भारतासाठी गौरवाचा क्षण असतो; मात्र एखादा खेळाडू एवढे मोठे पदक मिळण्याच्या शेवटच्या अटीतटीच्या क्षणी, देशासाठी पदक मिळवण्याचे लक्ष्य समोर असतांना नोकरीचा विचार कसा करू शकतो ? हे चित्र त्याची स्वार्थी मानसिकता दर्शवणारे नव्हे का ? ‘याला आपली शिक्षणव्यवस्था, मुलांवर संस्कार करण्यात न्यून पडणारे पालक हे सर्वच उत्तरदायी आहेत’, असे वाटते. ‘मिळालेले पदक हे देश किंवा देव यांना अर्पण करायचे आहे’, असा त्यांचा विचार नसतो. आज कित्येक खेळाडू विज्ञापनांच्या माध्यमातून पैसे कमावतात; पण ‘उत्पन्नाचा काही भाग देश आणि देव यांसाठी अर्पण करायचा आहे’, याचा त्यांना विसरच पडलेला आहे. छत्रपती शिवरायांनी वयाच्या १६ व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्या वेळी त्यांनी मनात कोणतीही इच्छा न ठेवता ‘हे राज्य श्रींच्या चरणी अर्पण’ केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही ‘देहाकडून देवाकडे जाणार्या प्रवासात देश लागतो आणि त्या देशाचे आपण ऋण फेडायचे आहेत’, असे म्हटले. प्रत्येक खेळाडूूला ‘खेळासह देशाचे ऋण फेडण्याचेही शिक्षण देणे’, ही काळाची आवश्यकता बनली आहे.
– श्री. निनाद गाडगीळ, सनातन संकुल, देवद, पनवेल.